भरधाव वाहनाने उडवले; चापाेलीचा तरुण जागीच ठार
By राजकुमार जोंधळे | Updated: March 31, 2025 23:24 IST2025-03-31T23:24:23+5:302025-03-31T23:24:41+5:30
नागपूर - रत्नागिरी महामार्गावरील घटना

भरधाव वाहनाने उडवले; चापाेलीचा तरुण जागीच ठार
राजकुमार जाेंधळे
चापोली (जि. लातूर) : भरधाव वाहनाने दिलेल्या जाेराच्या धडकेत एक तरुण जागीच ठार झाल्याची घटना नागपूर - रत्नागिरी महामार्गावरील चापाेली येथे साेमवारी पहाटे घडली. याबाबत चाकूर पाेलिस ठाण्यात अपघाताची नाेंद करण्यात आली आहे. रामदास बळीराम जगदाळे (वय ४८) असे अपघातातील मृताचे नाव आहे.
पाेलिसांनी सांगितले, चापोली येथील तरुण रामदास जगदाळे यांची नागपूर - रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गालगत चापाेली येथे शेती आहे. ते साेमवार, ३१ मार्च राेजी पहाटे ५:०० वाजता लघुशंकेसाठी गेले होते. दरम्यान, अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर अज्ञात वाहनचालक पसार झाला आहे. घटनास्थळी चाकूर पाेलिसांनी भेट देऊन पंचानामा केला. मृतदेहाचे चापाेली प्राथमिक आरोग्य केंद्रात विच्छेदन करण्यात आले. सायंकाळी ६:३० वाजता त्यांच्या पार्थिवावर सार्वजनिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार कऱण्यात आले.
याबाबत चाकूर पाेलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे. बीट जमादार ईश्वर स्वामी, पोकॉ. हणमंत मस्के हे तपास करीत आहेत. मृत रामदास जगदाळे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, दोन मुली व नातू असा परिवार आहे.