भरधाव टेम्पाेने मोपेडवरील आई- मुलास चिरडले
By राजकुमार जोंधळे | Updated: May 16, 2023 19:46 IST2023-05-16T19:45:11+5:302023-05-16T19:46:26+5:30
लातूर-जहिराबाद महामार्गावर बाभळगावची घटना

भरधाव टेम्पाेने मोपेडवरील आई- मुलास चिरडले
लातूर : भरधाव आयशर टेम्पाेने दुचाकीला चिरडल्याने आई-मुलगा ठार झाला असून, अन्य एक महिला गंभीर जमखी झाली आहे. हा अपघात मंगळवारी सकाळी लातूर-जहिराबाद महामार्गावरील बाभळगाव येथे झाला. याबाबत लातूर ग्रामीण पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
पाेलिसांनी सांगितले, लातूर तालुक्यातील बाभळगाव येथील महाविद्यालयासमोर भरधाव टेम्पाेने (एम.एच. ०४ जी.आर. ४११२) दुचाकीला (एम.एच. २४ ए.एन. ७९६४) चिरडले. यामध्ये दुचाकीला टेम्पाेने काही अंतरावर फरफटत नेले. यामध्ये शांताबाई रमेश राऊत (वय ४०) या जागीच ठार झाल्या. तर मुलगा अविनाश रमेश राऊत (वय २२) आणि राधाबाई महादेव राऊत (वय ३२ सर्व रा. साराेळा ता. जि. लातूर) हे दाेघे गंभीर जखमी झाले. घटनास्थळी दाखल झालेल्या नागरिकांनी जखमींना तातडीने लातूरच्या शासकीय सर्वाेपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
मात्र, मुलगा अविनाश याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या राधाबाईवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हा अपघात एवढा भीषण हाेता की, दुचाकी टेम्पाेच्या खाली अडकली हाेती. ती काही अंतरावर फरफटत गेल्याने दुचाकीचा चुराडा झाला. याबाबत लातूर ग्रामीण पाेलिस ठाण्यात गुन्हा दखल करण्याची प्रक्रिया सुरु असून, अधिक तपास पाेलिस करत आहेत.