अनैतिक संबंधातून एकास कोयत्याने तोडले; दुसऱ्याच दिवशी सहआरोपी महिलेने संपवले जीवन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 11:51 IST2025-04-01T11:50:39+5:302025-04-01T11:51:21+5:30
करकट्टा शिवारात भर दिवसा एकाचा खून झाल्याची घटना रविवारी उघडकीस आली होती. मुरुड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद

अनैतिक संबंधातून एकास कोयत्याने तोडले; दुसऱ्याच दिवशी सहआरोपी महिलेने संपवले जीवन
मुरुड (जि. लातूर) : अनैतिक संबंधातून कोयत्याने वार करून करकट्टा शिवारात एका ४० वर्षीय व्यक्तीचा खून केल्याची घटना रविवारी (दि. ३०) घडली होती. या प्रकरणात सहआरोपी असलेल्या महिलेने सोमवारी सकाळी करकट्टा शिवारात लिंबाच्या झाडाला गळफास घेतल्याची घटना उघडकीस आली आहे. दरम्यान, याबाबत मुरुड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी सांगितले, करकट्टा शिवारात रविवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास शरद प्रल्हाद इंगळे (४०) याचा ऊस तोडण्याच्या कोयत्याने गळ्यावर वार करून खून करण्यात आला होता. याप्रकरणी पाचजणांवर कलम १०३, ६१(२), ३(५) बीएनएसप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यातील रोहन ऊर्फ सोनट्या बाळासाहेब शिंदे यास अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे, तर उर्वरित तीन आरोपींना पोलिसांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, सहआरोपी असलेल्या महिलेने सोमवारी सकाळी करकट्टा शिवारातील वनविभागाच्या जंगलात असलेल्या लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेतल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी प्रेत उत्तरीय तपासणीसाठी लातूरच्या शासकीय रुग्णालयात पाठविले असून, आत्महत्येप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद मुरुड पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
पोलिसांकडून तपास सुरू
खून प्रकरणात सहआरोपी असलेल्या महिलेने आत्महत्या का केली, का तिचा घातपात केला या अनुंषगानेही मुरुड पोलिस तपास करीत आहे. दरम्यान, उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेशकुमार राऊत, सहायक पोलिस निरीक्षक अशोक उजगरे, सहायक पोलिस निरीक्षक हाडबे, पोलिस उपनिरीक्षक नागरगोजे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली घटनेची माहिती
वनविभागातील अधिकारी, कर्मचारी करकट्टा शिवारात वन पाहणीसाठी गेले असता लिंबाच्या झाडाला एका महिलेने गळफास घेतल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलिस घटनास्थळी पोहोचले असता आत्महत्या केलेली महिला खून प्रकरणातील सहआरोपी असल्याचे समोर आले, अशी माहिती तपासी अधिकारी हाडबे यांनी दिली.