अहमदपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहा महिन्यात ५४ चोरीच्या घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:15 IST2021-06-24T04:15:08+5:302021-06-24T04:15:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अहमदपूर : गेल्या सहा महिन्यांत अहमदपूर पोलीस स्थानकाच्या हद्दीत चोरीच्या ५४ घटना घडल्या आहेत. त्यातील केवळ ...

अहमदपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहा महिन्यात ५४ चोरीच्या घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदपूर : गेल्या सहा महिन्यांत अहमदपूर पोलीस स्थानकाच्या हद्दीत चोरीच्या ५४ घटना घडल्या आहेत. त्यातील केवळ ८ घटनांचा तपास लागला असून, ४६ चोरीच्या घटनांचा तपास लालफितीत अडकला आहे. सततच्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
अहमदपूर पोलीस स्थानकांतर्गत मागील सहा महिन्यांच्या कालावधीत चोरीच्या ५४ घटना घडल्या आहेत. त्यात किरकोळ चोरी ३७, जबरी चोरी ११ आणि ६ घरफोड्यांचा समावेश आहे. नागरिक, व्यापारी, बाहेरगावी राहण्यासाठी गेलेले शिक्षक-प्राध्यापक, ज्वेलर्स दुकानदार यांच्या घरावर पाळत ठेवून चोरीच्या घटना घडल्याचे दिसून येत आहे. तसेच एका पेट्रोल पंपाची साडेपाच लाख रुपयांची कॅश ड्रॉव्हरमधून चोरी केल्याची घटना घडली आहे. यामध्ये सीसीटीव्ही फुटेज व बाकी यंत्रणेद्वारे केवळ एक-दोन दिवस तपास केला जातो, त्यानंतर चोरीच्या घटनांचा तपास संथगतीने होत असल्याचे चित्र आहे. यामुळे तालुक्यातील गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक कार्यरत आहे की नाही, याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे. जूनच्या पहिल्या पंधरवड्यातच चोरीच्या १० घटना घडल्या असून, त्यात घरफोडीच्या २, जबरी चोरीच्या ३ तर किरकोळ चोरीच्या ५ घटनांचा समावेश आहे. त्यातच सराफा व्यापारी संजय गोटमवाड यांच्या घरात चोरी झाल्यामुळे सर्व नागरिक, व्यापाऱ्यांत घबराट पसरली आहे. चोरीच्या घटनांना आळा घालावा, अशी मागणी शहरातील नागरिकांमधून होत आहे.
गस्तीसाठी दोन पथकांची गरज...
अहमदपूर पोलीस स्थानकामध्ये एकच वाहन असून, एकच पथक रात्री फिरत असते. त्यामुळे वाहन एका भागात फिरत असताना दुसऱ्या भागात घरफोडी झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे गस्तीसाठी दोन पथके तैनात करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
तपासासाठी दोन पथके कार्यरत...
सराफा घरफोडीच्या तपासासाठी जिल्हा व जिल्ह्याबाहेर अनेक ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. या गुन्ह्याच्या तपासासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. नागरिकांनीही आपल्या घरात सीसीटीव्ही बसवावे किंवा बाहेर जाताना शेजाऱ्यांना कल्पना देऊन जावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ यांनी केले.
सराफा असोसिएशनचे निवेदन...
चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने सराफा व्यापाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांनी या गुन्ह्याचा तपास करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनावर सचिन करकानाल, माधव वलसे, भरत इगे, संतोष मद्वेवाड, बापू गोखरे आदींसह पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.