४० टक्के बसेस अद्यापही आगारातच; अनेक गावांना टमटमचा आधार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:15 IST2021-06-25T04:15:34+5:302021-06-25T04:15:34+5:30
सध्या लातूर आगारातून वेगवेगळ्या मार्गांवरून ७० बसेस प्रवाशांना सेवा देत आहेत. त्यातून लातूर आगाराला दिवसाकाठी ८ लाखांच्या आसपास उत्पन्न ...

४० टक्के बसेस अद्यापही आगारातच; अनेक गावांना टमटमचा आधार !
सध्या लातूर आगारातून वेगवेगळ्या मार्गांवरून ७० बसेस प्रवाशांना सेवा देत आहेत. त्यातून लातूर आगाराला दिवसाकाठी ८ लाखांच्या आसपास उत्पन्न मिळत आहे. लॉकडाऊनपूर्वी १२ लाखांच्या आसपास उत्पन्न मिळत होते. मात्र सद्यस्थितीत ते ८ लाखांवर आहे. प्रवाशांचा प्रतिसाद वाढल्यानंतर शंभर टक्के गाड्या सुरू करण्याचे नियोजन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून केले जाणार आहे.
या गावांना बसची प्रतीक्षा
सध्या जिल्ह्यातील अनेक मोठ्या गावांतही बस सुरू झालेली नाही. त्यामध्ये मोटेगाव, शेरा, पोहरेगाव, लहानेवाडी, वांजरखेडा, खरोळा, रामेश्वर आदींसह अन्य गावांचा समावेश आहे. शिवाय, ज्या मोठ्या गावांत कोरोनापूर्वी तीन-चार वेळा बसेस धावत होत्या, त्या गावात एक-दोन फेऱ्या केल्या जात आहेत. यामुळे या गावांना टमटमचा आधार शहरात येण्यासाठी घ्यावा लागत आहे.
प्रतिसाद वाढल्यानंतर बसेस सोडणार
प्रवाशांचा हळुहळू प्रतिसाद वाढत आहे. लांब पल्ल्याच्या तसेच जिल्ह्याबाहेरील आणि आंतरराज्य बससेवा सुरू केलेली आहे. या बसेसना प्रवाशांचा प्रतिसाद मिळू लागला आहे. जिल्हाअंतर्गत मार्गावर काही गाड्या अद्याप सोडलेल्या नाहीत. प्रतिसाद वाढल्यानंतर त्या मार्गावरून लवकरच बसेस सुरू केल्या जातील, असे आगार व्यवस्थापक जाफर कुरेशी यांनी सांगितले.
बस अद्याप सुरू झालेली नाही. त्यामुळे शहरात जाण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. खरेदी करण्यासाठी शहरात जावे लागते. परंतु, बस सुरू न झाल्यामुळे अडचण आहे. खासगी वाहनांचा आधार घेण्याशिवाय दुसरा पर्याय सध्या तरी नाही. - भागवत लांडगे, प्रवासी
आमच्या गावात पूर्वीप्रमाणे बसेस अद्याप सोडलेल्या नाहीत. त्यामुळे अडचण होते. खासगी वाहनांतून प्रवास करावा लागत आहे. बस सुरू होईल, याची प्रतीक्षा आहे. महामंडळाने पूर्वीप्रमाणे गाड्या सोडल्या तर प्रवाशांची सोय होईल.
- प्रवासी