किल्लारी : औसा तालुक्यातील जुनी सरणी (भाग २) ते माकणी, बेलकुंड, औसा रस्त्याला जोडण्यासाठी अवघे तीन किमीचे अंतर आहे. मात्र, पाटबंधारे विभागाचे नाहरकत मिळत नसल्यामुळे रस्ता तयार होत नव्हता. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पुढाकार घेऊन हा प्रश्न तीन दिवसांत सोडविला. त्यामुळे सारणी गावात आनंद व्यक्त होत आहे.
सारणी हे गाव औसा तालुक्यातील व उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमेवर आहे. या गावानजीक माकणी हे गाव असून तिथे बाजारपेठ आहे. दवाखाना, कापड, किराणा व अन्य कामांसाठी गावातील नागरिकांना लातूर, उस्मानाबाद, सोलापूरला जाण्यासाठी मातोळा, लोहटामार्गे जवळपास २० किमीचे अधिकच्या अंतरावरून जावे लागते. सारणी गावाजवळून अवघ्या तीन किमीवर माकणी-बेलकुंड जाणारा रस्ता आहे. या रस्त्यास सारणी गावचा रस्ता जोडल्यास दळणवळणाचा प्रश्न संपुष्टात येणार होता.
रस्ता नसल्यामुळे पाटबंधारे विभागाच्या निम्न तेरणा प्रकल्पाच्या कालव्याच्या रस्त्याने जावे लागते. हा रस्ता व्हावा म्हणून सारणी भाग- २ मधील नागरिक भूकंपापासून प्रयत्नशील होते. तत्कालीन आमदार, खासदारांकडे गाऱ्हाणे मांडले होते. त्यांनीही प्रयत्न केला होता; पण यश आले नव्हते. कारण, रस्त्यासाठी आवश्यक असणारी जमीन ही उस्मानाबाद पाटबंधारे विभागाच्या निम्न तेरणा प्रकल्पाच्या कालव्यासाठी संपादित होती.
अखेर शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष संतोष सोमवंशी यांच्यामार्फत सारणीचे रतन तमशेट्टी, राजेंद्र बिराजदार, शहाजी नारायणकर, विजय बिराजदार यांच्या शिष्टमंडळाने खा. ओमराजे निंबाळकर यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. तेव्हा खा. ओमराजे निंबाळकर यांनी शुक्रवारी पंचायत समिती सभागृहातील बैठकीत हा प्रश्न उपस्थित केला. तिथेच पाटबंधारे विभागाकडून रस्त्यासाठी लेखी नाहरकत प्रमाणपत्र देण्यात आले.
पाटबंधारे विभागाकडून नाहरकत...
पाटबंधारे विभागाने तेरणा प्रकल्पाच्या डाव्या कालव्याच्या दक्षिण दिशेने संपादित केलेल्या जमिनीवरून तीन किमीचा रस्ता करण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र दिले आहे. ३० वर्षांपासूनचा रस्त्याचा प्रश्न अखेर सुटल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. औसा येथील बैठकीस शिवसेनेेचे माजी जिल्हाध्यक्ष संतोष सोमवंशी, मुन्ना शेख, शिवाजी माने, राजेंद्र बिराजदार, शहाजी नारायणकर, अनिल कदम, रतन तमशेट्टी, विजय बिराजदार, श्रीशैल्य पाटील, शिवाजी यशवंते उपस्थित होते.