कपाटात २१ तोळे दागिने ठेऊन घरमालक निर्धास्त, ३ महिन्यांनी तिजोरी रिकामी आढळली
By हरी मोकाशे | Updated: November 30, 2022 15:59 IST2022-11-30T15:58:37+5:302022-11-30T15:59:27+5:30
पोलिसांनी ठसे तज्ज्ञांना पाचारण करुन तपास सुरू केला आहे.

कपाटात २१ तोळे दागिने ठेऊन घरमालक निर्धास्त, ३ महिन्यांनी तिजोरी रिकामी आढळली
लातूर : शहरातील नई आबादी भागातील एका घरातील कपाटातून २१ तोळे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने पळविल्याची घटना घडली. याप्रकरणी उदगीर शहर पोलीस ठाण्यात बुधवारी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उदगीर शहर पोलिसांनी सांगितले, शहरातील संमिश्र कॉलनी, नई आबादी भागात गुरुनाथ कार्तिक स्वामी मठपती यांचे घर आहे. त्यांनी घरातील कपाटात २३ ऑगस्ट २०२२ रोजी रात्री २१ तोळ्यांचे सोन्याचे दागिणे ठेवले होते. दरम्यान, कपाटातील हे दागिणे अज्ञात चोरट्याने पळविल्याची घटना सोमवारी सकाळी त्यांना कपाटातील लॉकर उघडल्यानंतर लक्षात आले.
त्यामुळे त्यांनी उदगीर शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन माहिती दिली. पोलिसांनी ठसे तज्ज्ञांना पाचारण करुन तपास सुरू केला आहे. याप्रकरणी गुरुनाथ कार्तिक स्वामी यांच्या जबाबावरून बुधवारी पहाटे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दागिण्यांची किंमत ५ लाख ९९ हजार २०० रुपये आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.