गणेश उत्सव काळात उदगीर तालुक्यातील १९ जणांना प्रवेश बंदी !
By राजकुमार जोंधळे | Updated: September 3, 2022 17:57 IST2022-09-03T17:57:23+5:302022-09-03T17:57:46+5:30
अन्य जिल्ह्यांतून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला आहे.

गणेश उत्सव काळात उदगीर तालुक्यातील १९ जणांना प्रवेश बंदी !
लातूर : श्री गणेश विसर्जन शांततेत पार पडण्यासाठी, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी उदगीर तालुक्यातील १९ जणांविराेधात तीन दिवस प्रवेश बंदीची कारवाई केली आहे. याबाबत पाेलीस प्रशासनाने उपजिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव दाखल केले हाेते. दरम्यान, या प्रस्तावर सुनावणीनंतर अंतिम निर्णय घेण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, उदगीर शहरासह तालुक्यात गणेशोत्सव आणि विसर्जन काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी उदगीर शहर आणि ग्रामीण पोलीस ठाण्यांच्या हद्दीअंतर्गत येणाऱ्या, उत्सव काळात धार्मिक तेढ निर्माण करणे, शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या, खुनाचा प्रयत्न करणाऱ्या, दारू पिऊन लोकांना मारहाण करत जबर दुखापत करणाऱ्या, बेकायदेशीर जमाव जमवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या लोकांविराेधात अलीकडच्या काळात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. अशा गुन्हेगारी वृत्तीच्या १९ जणांविराेधात उदगीर शहर आणि ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत ४ ते ६ सप्टेंबरपर्यंत फौजदारी दंडसंहिता कलम १४४ अन्वये ‘तात्पुरत्या स्वरूपात प्रवेश बंदी’ची कारवाई उदगीरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी केली आहे. उत्सवकाळात लातूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, गणेशोत्सव शांततेत पार पडावा यासाठी गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी, नागरिक, कार्यकर्ते यांची पोलीस मित्र समिती, शांतता समिती, पोलीस ठाण्याच्या स्तरावर बैठका घेण्यात आल्या आहेत.
अन्य जिल्ह्यातून मागवला बंदोबस्त...
गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांना गणेशोत्सव साजरा करण्याबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. लातूर पोलीस दलाकडे असलेले मनुष्यबळ या व्यतिरिक्त अन्य जिल्ह्यांतून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला आहे.
- निखिल पिंगळे, पोलीस अधीक्षक, लातूर