अवैधपणे १८ महिन्यांचे मूल दत्तक घेतले; लातूरमधील उदगीर येथे आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल
By राजकुमार जोंधळे | Updated: May 29, 2025 08:20 IST2025-05-29T08:19:37+5:302025-05-29T08:20:57+5:30
१०० रुपयांच्या मुद्रांकावर पाच जणांच्या साक्षीदार म्हणून स्वाक्षऱ्या

अवैधपणे १८ महिन्यांचे मूल दत्तक घेतले; लातूरमधील उदगीर येथे आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल
राजकुमार जाेंधळे, उदगीर (जि. लातूर): शंभर रुपयांच्या मुद्रांकावर एका १८ महिन्याच्या चिमुकलीला अवैधपणे दत्तक दिल्याचा प्रकार समाेर आला. याबाबत उदगीर शहर पाेलीस ठाण्यात बुधवारी रात्री उशिरा आठ जणांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले की, १० ते १२ सप्टेंबर २०२३ रोजी उदगीरातील इंदिरा नगरात १८ महिन्याचे बाळ शंभर रुपयाच्या मुद्रांकावर अवैधपणे दत्तकपत्र करुन दिले. यासाठी पाच जणांनी साक्षीदार म्हणून स्वाक्षऱ्या केल्या. तर एका वकिलाने ओळख म्हणून स्वाक्षरी केली.
याबाबत जिल्हा बाल संरक्षण अधिकारी धम्मानंद कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर उदगीर शहर पाेलिस ठाण्यात परवीन अल्लाउद्दीन पिंजारी (रा. इंदीरानगर उदगीर), जबीन अहेमद बागवान, अहेमद जलीलसाब बागवान (दोघे रा. भवानी दापका ता. कमालनगर जि. बिदर), शेख ताहेर अब्दुलसाब, शामद जलीलसाब बागवान, अरबाज शामद बागवान, शहनाज जलीलसाब बागवान, गुलाम यासदानी शेख (सर्व रा. उदगीर) यांच्याविराेधात गुन्हा दाखल केला आहे. तपास पोउपनि. गजानन काळे हे करीत आहेत.