मांजरा धरणाच्या २ दरवाजातून १७४७ क्युसेक पाण्याचा विसर्ग
By राजकुमार जोंधळे | Updated: October 17, 2022 19:49 IST2022-10-17T19:48:57+5:302022-10-17T19:49:14+5:30
दोन दरवाजे बंद : अन्य दोन दरवाजांतून पाणी नदीपात्रात

मांजरा धरणाच्या २ दरवाजातून १७४७ क्युसेक पाण्याचा विसर्ग
लातूर : मांजरा धरण शंभर टक्के भरले असून, रविवारी चार दरवाजांतून ३४९४.६७ क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात आला होता. सोमवारी दुपारनंतर पावसाने उघडीप दिल्याने दोन दरवाजे बंद करण्यात आले असून, अन्य दोन दरवाजांतूनच १७४७.३३ क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रातून केला जात आहे. मांजरा प्रकल्पातून रविवारी सायंकाळी एक, सहा आणि चार, तीन क्रमांकाच्या दरवाजामधून पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता.
सोमवारी दुपारी १ वाजता चार व तीन क्रमांकाचे दरवाजे बंद करण्यात आले असून, सध्या एक व सहा क्रमांकाच्या दरवाजातून ०.२५ सें.मी.ने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. एकूण ४९.४८ घनमीटर सेकंदने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे मांजरा नदी दुतर्फा भरून वाहत आहे. धरणात पाण्याची होणारी आवक लक्षात घेऊन विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाहीही धरण प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
तीन व चार क्रमांकाचा दरवाजा बंद
मांजरा धरणातून सोमवारी दुपारी १ वाजेपर्यंत एकूण चार दरवाजांतून विसर्ग केला जात होता. मात्र धरणात येणारी पाण्याची आवक कमी झाल्याने चार व तीन क्रमांकाचे दरवाजे बंद केले आहेत. आता एक व ६ क्रमांकाचे असे दोन दरवाजे उघडून विसर्ग सुरू आहे, अशी माहिती शाखा अभियंता सूरज निकम यांनी दिली.