अहमदपूर : कोरोनाच्या कालावधीत लॉकडाऊन करण्यात येऊन कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. या काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर अहमदपूर उपविभागीय पोलीस कार्यालय व पालिकेच्यावतीने कारवाई करण्यात येऊन १३ लाख २६ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. यात विनामास्क आढळलेल्या २ हजार १७४ जणांवर तसेच २ हजार ८४४ वाहनांवर कारवाई करण्यात आली.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव वाढला होता. त्यामुळे प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले होते. याशिवाय, लॉकडाऊन करण्यात आले होते. या कालावधीत अहमदपूर उपविभागीय पोलीस कार्यालयांतर्गत २ हजार ८४४ वाहनांवर कारवाई करण्यात येऊन ६ लाख ८१ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता, तसेच संसर्गजन्य आजार प्रतिबंधक कायद्यांतर्गत १८८ अन्वये ६४ केसेस दाखल करण्यात आल्या, तसेच दंडही आकारण्यात आला.
अहमदपूर पालिकेने विनाकरण, विनामास्क फिरणाऱ्या २ हजार १७४ जणांवर कारवाई करीत ४ लाख ७४ हजार १०० रुपये तर नियमबाह्य अस्थापना चालू ठेवलेल्या १३३ दुकानदारांवर कारवाई करीत १ लाख ७१ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल केला. पालिकेने एकूण २ हजार ३०७ जणांवर कारवाई करीत एकूण ६ लाख ४५ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल केला.
अहमदपूर पोलीस उपविभाग व पालिकेने मिळून १३ लाख २६ हजारांचा दंड वसूल केला आहे. पोलीस, महसूल व पालिकेने केलेल्या कारवाईमुळे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत झाली आहे. सध्या तालुक्यात केवळ १० बाधित रुग्ण आहेत. त्यामुळे तालुक्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
दंड आकारणे हा पर्याय नाही...
दंड वसूल करणे हे पोलिसांचे काम नसून, केवळ शिस्त लावणे व त्यासाठी नागरिकांत जागृती करणे महत्त्वाचे आहे. दंड आकारणे हा त्यातील एक पर्याय आहे; मात्र नागरिकांनी स्वतःहून कोविड नियमांचे पालन करावे. त्यामुळे भविष्यात येणाऱ्या अडचणीला सामोरे जाता येईल, असे उपविभागीय पोलीस अधिकारी बलराज लंजिले यांनी सांगितले.
दंडाची रक्कम कोरोना कामासाठी...
कोविड काळात पालिकेच्यावतीने २०० पेक्षा अधिक कंटेनमेन्ट झोन तयार केले होते, तसेच २५ मयत व्यक्तींवर अंत्यसंस्कार, प्रत्येक ठिकाणी निर्जंतुकीकरण, जनजागृती करण्यात आली. त्यासाठी दंडाची रक्कम वापरण्यात आली आहे. यापुढेही ती वापरण्यात येणार असल्याचे पालिकेचे मुख्याधिकारी त्रंबक कांबळे यांनी सांगितले.
प्रशासनाचा समन्वय, नागरिकांची मदत...
तालुक्यातील पोलीस, पालिका, महसूल व आरोग्य यंत्रणेच्या समन्वयामुळे आणि जागरूक नागरिकांमुळे अहमदपूर तालुक्यातील कोरोनाचा प्रभाव कमी झाला आहे. आगामी काळात प्रादुर्भाव होऊ नये म्हणून नागरिकांनी कोविड नियम पाळावेत, असे आवाहन तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी केले आहे.