अहमदपुरातील शंभर खाटांचे कोविड हॉस्पिटल अजूनही कागदावरच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:19 IST2021-04-21T04:19:54+5:302021-04-21T04:19:54+5:30

अहमदपूर : अहमदपूर तालुक्यात कोरोनाचा आलेख वाढत असल्याने कोविड आढावा बैठकीत १०० खाटांचे कोविड हॉस्पिटल उभारण्याविषयी सूचना देऊन मान्यता ...

The 100-bed Kovid Hospital in Ahmedpur is still on paper! | अहमदपुरातील शंभर खाटांचे कोविड हॉस्पिटल अजूनही कागदावरच !

अहमदपुरातील शंभर खाटांचे कोविड हॉस्पिटल अजूनही कागदावरच !

अहमदपूर : अहमदपूर तालुक्यात कोरोनाचा आलेख वाढत असल्याने कोविड आढावा बैठकीत १०० खाटांचे कोविड हॉस्पिटल उभारण्याविषयी सूचना देऊन मान्यता देण्यात आली होती. मात्र, बैठक होऊन आठ दिवस उलटले तरी अद्यापही रुग्णालय कागदावरच असून प्रशासनाकडून अद्यापपर्यंत कुठलीही तयारी सुरू झाली नसल्याचे पहावयास मिळत आहे.

अहमदपूर तालुक्याच्या कोविड आढावा बैठकीत पालकमंत्री अमित देशमुख यांच्या निर्देशावरून जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी अहमदपुरातील महसूल प्रशासनास १०० खाटांचे रुग्णालय उभारण्याविषयी सूचना केली होती. त्यासंबंधी तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी मरशिवणी येथील कोविड केअर सेंटर अथवा एक सुसज्ज मंगल कार्यालयाची पाहणी करण्यात आली होती. त्यानंतर महसूलने कोविड केअर सेंटरवर ऑक्सिजनची व्यवस्था करणे, १०० खाटांची व्यवस्था करणे यासंबंधीच्या सूचना केल्या होत्या. मात्र, आठ दिवस उलटले तरी याबाबत कुठलीही प्रगती झाली नाही. तसेच ऑक्सिजन पाईपलाईनसाठी निविदा अथवा प्रशासकीय मान्यता झाली नाही. खाटांच्या व्यवस्थेसंबंधी महसूल प्रशासनाने कुठलीही हालचाल केली नाही. त्यामुळे कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या वाढूनही कोविड हॉस्पिटल मात्र कागदावरच राहिले आहे. त्यातच दोन खासगी हॉस्पिटलमध्ये १७, तर ग्रामीण रुग्णालयांमध्ये १० असे केवळ २७ ऑक्सिजनयुक्त बेड उपलब्ध आहेत. तसेच केवळ तीन व्हेंटिलेटरवर उपलब्ध आहेत.

तालुक्यात १ हजार ५५६ कोरोनाबाधित असून कोविड केअर सेंटरला ५३, सर्वोपचारला ३६, तर अन्य ठिकाणी ५५ रुग्ण उपचार घेत आहे. मागील चार दिवसांत १५ बधितांचा मृत्यू झाला आहे. तालुक्यातील काही रुग्णांना उपचारासाठी लातूर, नांदेड, उदगीर, हैदराबाद, औरंगाबाद या ठिकाणी जावे लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने त्वरित शंभर खाटांचे रुग्णालय तयार करावे, अशी मागणी होत आहे.

कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन पाईपलाईन नाही...

मरशिवणी येथील कोविड केअर सेंटरमध्ये तात्पुरते ५० खाटांचे व त्यानंतर १०० खाटांचे रुग्णालय उभे करावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. मात्र, त्यासाठी आवश्यक असलेला ऑक्सिजन पाईपलाईन नाही. केवळ दहा ऑक्सिजन खाटांचे रुग्णालय सुरू आहे, असे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्तात्रय बिराजदार यांनी सांगितले.

प्रशासकीय मान्यता नाही...

शंभर खाटांचे रुग्णालय उभारावे, अशी पालकमंत्र्यांनी सूचना केली. याबाबत जिल्हा स्तरावरून कुठलाही आदेश आला नाही. त्यामुळे हे काम चालू नाही, असे उपविभागीय अधिकारी प्रमोद कुदळे यांनी सांगितले.

गोरगरीब रुग्णांचे हाल...

सध्या कोरोनाचा संसर्ग ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर पसरला आहे. अनेकजण या आजारासंदर्भात अज्ञानी आहेत. त्यामुळे पॉझिटिव्ह आल्यानंतर एक भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. तसेच आर्थिकबाबतीत सक्षम नसल्यामुळे रुग्णाला कुठे दाखल करावे, याबाबत संभ्रम आहे. त्यामुळे त्वरित अहमदपूर येथे शंभर खाटांचे रुग्णालय उभारावे, अशी मागणी सिद्धार्थ सूर्यवंशी यांनी केली आहे.

Web Title: The 100-bed Kovid Hospital in Ahmedpur is still on paper!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.