सापाची दुर्मीळ जात शोधण्यात कोल्हापुरातील युवकांचा वाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 11:14 AM2019-09-28T11:14:46+5:302019-09-28T11:17:52+5:30

सातारा जिल्ह्यातील कोयनेच्या अधिवासातच आढळणाऱ्या सापाच्या दुर्मीळ आणि नव्या जातीचा शोध लावण्यात संशोधकांना यश आले आहे. हा साप झाडावर राहणारा आणि बिनविषारी असून, निशाचर आहे.

Youths from Kolhapur contribute to finding rare snake species | सापाची दुर्मीळ जात शोधण्यात कोल्हापुरातील युवकांचा वाटा

सापाची दुर्मीळ जात शोधण्यात कोल्हापुरातील युवकांचा वाटा

googlenewsNext
ठळक मुद्देसापाची दुर्मीळ जात शोधण्यात कोल्हापुरातील युवकांचा वाटाकोयनेच्या जंगलात अधिवास : सापाला तेजस ठाकरे यांचे नाव

संदीप आडनाईक

कोल्हापूर : सातारा जिल्ह्यातील कोयनेच्या अधिवासातच आढळणाऱ्या सापाच्या दुर्मीळ आणि नव्या जातीचा शोध लावण्यात संशोधकांना यश आले आहे. हा साप झाडावर राहणारा आणि बिनविषारी असून, निशाचर आहे.

शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आणि युवा संशोधक तेजस ठाकरे यांच्यासोबत त्याचा शोध लावण्यात निसर्गप्रेमी स्वप्निल पवार आणि सरीसृप अभ्यासक डॉ. वरद गिरी या कोल्हापुरातील संशोधकांचा मोठा वाटा आहे.
अनेक दुर्मीळ वनस्पती आणि जीवांसाठी महाराष्ट्रातील पश्चिम घाट समृद्ध आहे. कोल्हापुरातील निसर्गप्रेमी स्वप्निल पवार यांना सर्वप्रथम मांजऱ्या प्रवर्गातील हा साप कोयनेच्या जंगलात आढळला. त्यांनी आणि युवा संशोधक तेजस ठाकरे यांनी यासंदर्भात वरद गिरी यांच्याशी संपर्क साधला.

सव्वाशे वर्षांनी आढळलेल्या या सापासंदर्भात बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या २६ सप्टेंबरच्या अंकात सरीसृप अभ्यासक आणि मूळचे कोल्हापूरचे सुपुत्र वरद गिरी यांचा शोधप्रबंध प्रसिद्ध झाला आहे. गिरी हे पुण्यातील फौंडेशन फॉर बायोडायव्हर्सिटी कॉन्झर्वेशनचे संचालक आहेत.

गिरी आणि स्वप्निल पवार यांच्यासोबत सापांविषयी जागतिक स्तरावर अभ्यास असणारे वर्गीकरणशास्त्रज्ञ अशोक कॅप्टन, लंडन येथील नॅचरल हिस्ट्री म्युझियमचे डॉ. व्ही. दीपक, जर्मनीतील बर्लिन येथील म्युझियम फर नेचरकुंडे म्युझियमचे डॉ. फ्रँक टिलॅक यांनी संशोधन करून या सापाविषयी शोधनिबंध प्रसिद्ध केला.

कोल्हापूरच्या स्वप्निल पवारचाही वाटा

कोल्हापूरच्या स्वप्निल पवार याचा या संशोधनात मोठा वाटा आहे. सर्वप्रथम त्यालाच हा साप आढळला होता. जंगलात फिरणे आणि अचूक नजर असणाऱ्या स्वप्निलने राजाराम कॉलेजमधून प्राणीशास्त्र विषयात पदवी घेतली आहे. गेली १५ वर्षे तो या क्षेत्रात काम करत आहे. त्याचे जंगलविषयक ज्ञान मोठे आहे. तेजस ठाकरे यांच्यासोबत तो काम करतो आहे.

बिनविषारी, दुर्मीळ कॅट स्नेक

मांजऱ्या प्रवर्गातील या सापाला ‘कॅट स्नेक’ म्हणून संबोधण्यात येते. यापूर्वी तो कधीही आढळला नसल्यामुळे आणि काहीच जाती शिल्लक असल्यामुळे दुर्मीळ असलेला हा साप केवळ कोयनेतच याचा अधिवास आढळला आहे. १८९४ मध्ये आढळलेल्या मांजऱ्या प्रवर्गातील ‘बोईगा’ या वंशातील हा साप आहे.

हे साप महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आढळतात; पण नव्याने आढळलेल्या या सापाची अद्याप नोंद झालेली नव्हती. खरं तर मांजऱ्या प्रवर्गातील सापांचे जमिनीवरचे आणि पाण्यातील बेडूक, सरडे, पाली हे खाद्य आहे. नव्याने शोधण्यात आलेल्या या सापाचे हुमायून नावाने ओळखला जाणारा आणि केवळ रात्रीच आढळणारा बेडूक आणि त्याची अंडी हे खाद्य आहे. झाडांवरच वास्तव्य करणारा हा साप जंगलात आणि प्रामुख्याने रात्रीच आढळतो. हा ८९0 मिलिमीटरपर्यंत म्हणजे तीन फूटांपर्यंत वाढू शकतो.

तेजस ठाकरे यांचे नाव नव्या जातीला

शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस यांना हा साप २0१५ मध्ये सर्वप्रथम आढळल्यामुळे या सापाचे ‘ठाकरेज कॅट स्नेक’ असे नामकरण करण्यात आले. यापूर्वी त्यांनी शोधलेल्या खेकड्यालाही ठाकरे यांचे नाव देण्यात आले आहे.


झाडांवरील बेडूक आणि बेडकांची अंडी हे या सापाचे खाद्य आहे. या सापाचे संशोधन सुरू असताना त्याला अनेकदा जमिनीवरील आणि पाण्यातील बेडूक देण्यात आले; पण त्याने ते खाल्ले नाहीत; मात्र झाडावरील बेडूक आणि त्याची अंडी मात्र त्याने खाल्ली. त्यामुळे हा वेगळ्या जातीचा साप असल्याचे सिद्ध झाले.
- डॉ. वरद गिरी
सरीसृप अभ्यासक

 

 

 

Web Title: Youths from Kolhapur contribute to finding rare snake species

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.