कोल्हापुरातील कसबा बीडला येथे सापडले यादवकालीन बेडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 13:44 IST2025-08-05T13:43:53+5:302025-08-05T13:44:09+5:30
यंदा तिसऱ्यांदा बेडे सापडले

कोल्हापुरातील कसबा बीडला येथे सापडले यादवकालीन बेडे
कसबा बीड : कसबा बीड गावात सोन्याचा पाऊस पडतो, अशी एक आख्यायिका आहे. त्याची प्रचिती पुन्हा आली. स्थानिक भाषेत या सुवर्ण मुद्रांना 'बेडा' असे संबोधले जाते. कसबा बीड गावच्या ग्रामस्थ आक्काताई आनंदा जाधव यांना अशा एका बेड्याचा शोध लागला आहे. जाधव मळ्याच्या शेतात निशिगंधाची भांगलन करत असताना त्यांना हा बेडा सापडला. बेडा यादवकालीन असून, तो १.७ सेमी लांब व ३.७५ ग्रॅम वजनाचा आहे.
यादवकालीन नाणी म्हणजे महाराष्ट्रातील यादव घराण्याच्या काळात (१२-१४ वे शतक) चलनात असलेली नाणी होय. कसबा बीड येथे सापडलेला हा बेडा 'गद्यन' (सोन्याची नाणी) प्रकाराचा आहे. यादवांची सोन्याची नाणी वेगवेगळ्या चिन्हांसाठी विविध ठसे वापरून तयार केली जातात.
नाण्याच्या मध्यभागी अष्टदल पद्म आहे, त्याच्या वरच्या बाजूस नाणे पाडणाऱ्या राजाच्या नागरी लिपीतील नाव असून, खाली धनुष्य आहे. अष्टदल पद्माच्या खालील बाजूस आडवा शंख, तर डाव्या बाजूस तेलुगू-कानडी लिपीतील 'श्री' हे अक्षर आहे आणि उजव्या बाजूस चक्राकार आकृती दिसते. नाण्याच्या मागील बाजू कोरडी आहे, तर त्याचा आकार बशीसारखा आहे.
यंदा तिसऱ्यांदा बेडे सापडले
याशिवाय, तानाजी बाबू यादव यांनाही लक्ष्मी मंदिर परिसरातील शेतात भांगलन करत असताना ०.४५ ग्रॅम वजनाचा एक तुकडा सापडला आहे. कसबा बीड गावात या वर्षी मृग नक्षत्राच्या सुरुवातीस सोने सापडल्याची ही तिसरी घटना आहे. सापडणारे बेडे प्राचीन कसबा बीडच्या गतवैभावाची साक्ष देतात. आजही अशा बेड्यांना दैवी आशीर्वादाच्या स्वरूपात पूजले जाते. कसबा बीडच्या ऐतिहासिक ठेव्याचे जतन, संवर्धन आणि संशोधन करणारी 'यंग ब्रिगेड सुवर्ण राजधानी कसबा बीड' ही संघटना अशा सुवर्ण मुद्रांची माहिती संकलित आणि प्रसारित करते.