व्हाईट आर्मीकडून जखमी घारींना जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 14:22 IST2019-04-30T14:21:18+5:302019-04-30T14:22:40+5:30
कोल्हापूर : आर. के. नगर व शाहूपुरी येथे जखमी अवस्थेत सापडलेल्या दोन घारींना व्हाईट आर्मीच्या जवानांनी जीवदान दिले. व्हाईट ...

व्हाईट आर्मीने जीवदान दिलेल्या दोन्ही घारींना इराणी खणीजवळील निसर्ग केंद्रात ठेवण्यात आले आहे.
कोल्हापूर : आर. के. नगर व शाहूपुरी येथे जखमी अवस्थेत सापडलेल्या दोन घारींना व्हाईट आर्मीच्या जवानांनी जीवदान दिले. व्हाईट आर्मीने आजवर किंगफिशर, करकोचा, बदक, मोर, घार, भैरी ससाणा, कावळा, कबूतर, चिमणी अशा विविध प्रकारच्या २० हून अधिक पक्ष्यांना, तसेच जखमी अवस्थेतील प्राण्यांना जीवदान देऊन पुन्हा निसर्गात सोडले आहे.
आर. के. नगर परिसरातील विक्रम कुलकर्णी यांनी व्हाईट आर्मीला घार जखमी अवस्थेत असल्याचे सांगितले. हे कळताच जवानांनी घारीला अलगद घेऊन डॉ. अनिल पाटील यांच्याकडे नेले. मुका मार आणि अशक्तपणा आलेल्या या घारीवर उपचार करण्यात आले. तसेच रविवारी (दि.२८) शाहूपुरीतील विल्सन पुलाशेजारी घार जखमी असल्याचे असिफ पत्रिवाले यांनी कळवले.
व्हाईट आर्मीच्या जवानांनी पाहणी केली असता, बाजूच्या इमारतीच्या एका होल्डिंगवर घारीचे घरटे दिसले. वाढलेल्या उष्म्यामुळे घार खाली पडली होती. डॉ. दीपक कदम यांच्याकडे घारीवर प्राथमिक उपचार करण्यात आले.
या दोन्ही घारींना इराणी खणीजवळ निसर्ग माहिती व प्रशिक्षण केंद्र येथील वातानुकूलित हवेत व प्रशस्त जागेत मोठ्या पिंजऱ्यात ठेवण्यात आले आहे. उपचारांसह त्यांच्या आहारावरही विशेष लक्ष देण्यात आले. व्हाईट आर्मीचे प्रमुख अशोक रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सौरभ कोटलगी, प्रशांत शेंडे, शैलेश रावण यांनी विशेष परिश्रम घेतले.