तब्बल २० भाषेत १५०० गायकांचे संविधान महागायन, कोल्हापुरात केला विश्वविक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 18:14 IST2025-09-15T18:13:38+5:302025-09-15T18:14:57+5:30

विशेषतः मूकबधिर विद्यार्थी-कलावंतांनी सांकेतिक भाषेद्वारे गायलेल्या संविधान प्रास्ताविक गायनाला उपस्थित नागरिकांनी दाद दिली

World record Samvidhan Mahagayan by 1500 singers in 20 languages in Kolhapur | तब्बल २० भाषेत १५०० गायकांचे संविधान महागायन, कोल्हापुरात केला विश्वविक्रम

तब्बल २० भाषेत १५०० गायकांचे संविधान महागायन, कोल्हापुरात केला विश्वविक्रम

कोल्हापूर : येथील दसरा चौकाने रविवारी रात्री एक वेगळाच माहोल अनुभवला. तब्बल १५०० गायकांनी २० भाषांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानातील प्रास्ताविकेचे महागायन केले आणि दसरा चौक एका विश्वविक्रमाचा साक्षीदार ठरला. यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची प्रमुख उपस्थिती होती.

संस्कृती मंत्रालय भारत सरकार, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र राज्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी ) पुणे व कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने भारतीय संविधान आणि लोकतंत्र दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त कबीर नाईकनवरे यांच्या संकल्पनेतून , 'हम भारत के लोग' अर्थात संविधान गीताचा महा विश्वविक्रम या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी देशातील विविध भागांतून आलेल्या गायक कलावंतांनी मराठी, इंग्रजी, संस्कृत, आसामी, मैथिली, राजस्थानी, हिंदी, भोजपुरी, ऊर्दू, नेपाळी यासारख्या वीस भाषांतील संविधान प्रास्तविकेचे गायनाद्वारे सादरीकरण केले. विशेषतः मूकबधिर विद्यार्थी - कलावंतांनी सांकेतिक भाषेद्वारे गायलेल्या संविधान प्रास्ताविक गायनाला उपस्थित नागरिकांनी दाद दिली. यावेळी धर्मेंद्र देशमुख यांनी संविधान प्रास्ताविकेच्या गायनाचा विश्वविक्रम झाल्याचे जाहीर करून याबाबतचे प्रशस्तिपत्र या अभिनव कार्यक्रमाचे संकल्पक कबीर नाईकनवरे यांना रामदास आठवले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

रामदास आठवले म्हणाले, व्यक्तीने जिंदादिली जपत असताना तो कलासक्त असणे गरजेचे आहे. भारतीय संगीत हे जागतिक दर्जाचे आहे . संविधानाच्या प्रास्ताविकेचे विश्वविक्रमी महागायन हा अत्यंत कौतुकास्पद व अभिनंदनीय उपक्रम आहे. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार राजेश क्षीरसागर, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, बार्टीचे महासंचालक सुनील वारे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सचिन साळे, प्रा. आनंद भोजने, सतीश माळगे, उत्तम कांबळे , शहाजी कांबळे यांच्यासह संविधान प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: World record Samvidhan Mahagayan by 1500 singers in 20 languages in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.