SSC Result2024: भडगावचा ‘तुषार’, अभ्यासात हुशार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2024 13:21 IST2024-05-28T13:19:15+5:302024-05-28T13:21:29+5:30
वडिलांचे निधन झाले, आईदेखील त्याला सोडून गेली. त्यामुळे आजी-आजोबांनीच सांभाळले

SSC Result2024: भडगावचा ‘तुषार’, अभ्यासात हुशार
राम मगदूम
गडहिंग्लज : वडिलांचे निधन झाले, आईदेखील त्याला सोडून गेली. त्यामुळे आजी-आजोबाच त्याचे पालनपोषण करतात. घरच्यांना कुंभारकामात मदत आणि मोबाइल दुरुस्तीच्या दुकानात काम करत तो ८१.६० टक्के गुणांनी दहावी उत्तीर्ण झाला. तुषार लक्ष्मण कुंभार (रा.भडगाव, ता. गडहिंग्लज) असे त्याचे नाव आहे.
सात वर्षांपूर्वी काविळच्या आजाराने तुषारचे वडील लक्ष्मण यांचे निधन झाले. त्यानंतर आईदेखील त्याला सोडून गेली. परंतु, आजी-आजोबा व काका सचिन हेच त्याचा सांभाळ करीत आहेत. दरवर्षी गणेशमूर्ती व दुर्गा मातेची मूर्ती तयार करणे हाच त्यांचा पारंपरिक व्यवसाय असून, त्यातही तो मदत करतो. दरम्यान, किमान शिक्षणाचा खर्च भागावा म्हणून तो आठवीत असल्यापासूनच मोबाइल दुरुस्तीच्या दुकानात काम करतो.
वाणिज्य शाखेची पदवी घेऊन बँकेत नोकरी करण्याची त्याची इच्छा आहे. त्यासाठी त्याला दानशूरांच्या पाठबळाची गरज आहे. तुषारला मुख्याध्यापक विजयकुमार चौगुले, उपमुख्याध्यापक उमेश सावंत, वर्गशिक्षिका गीता पाटील व शिक्षकांचे प्रोत्साहन लाभले.