Kolhapur: ‘केशवराव’चे काम जलदगतीने; पण क्रांतिदिनाचा मुहुर्त हुकणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 18:41 IST2025-08-06T18:41:26+5:302025-08-06T18:41:57+5:30

जोरदार पावसामुळे कामात व्यत्यय; तिसऱ्या टप्प्यातील कामाची वर्क ऑर्डर लवकरच

Work on Keshavrao Bhosale Theatre is progressing at a fast pace | Kolhapur: ‘केशवराव’चे काम जलदगतीने; पण क्रांतिदिनाचा मुहुर्त हुकणार

Kolhapur: ‘केशवराव’चे काम जलदगतीने; पण क्रांतिदिनाचा मुहुर्त हुकणार

कोल्हापूर : कोल्हापूरच्या नाट्यचळवळीचा मूकनायक असलेल्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागून गुरुवारी एक वर्ष पूर्ण होईल. आगीत भस्मसात झालेले नाट्यगृह एक वर्षात ‘जसेच्या तसे’ उभारण्याचा संकल्प महापालिका प्रशासन, राज्य सरकार, लोकप्रतिनिधी, कलाप्रेमी यांनी केला. काही तांत्रिक अडचणी तसेच पावसाचा जोरदार सामना करत, नाट्यगृह उभारण्याची प्रक्रिया गतीने सुरू असली तरी, क्रांतिदिनी याच नाट्यगृहात नाट्यप्रयोग करण्याचा मुहूर्त मात्र अपूर्ण कामामुळे हुकणार आहे.

महाराष्ट्राच्या नाट्य तसेच चित्रपट क्षेत्राला अनेक दिग्गज अभिनेते देणाऱ्या नाट्यगृहाला ८ ऑगस्टच्या रात्री लागलेल्या भीषण आगीनंतरचे भयाण दृश्य पाहून अवघी करवीरनगरी हळहळली होती. अनेक कलाकारांना त्यांच्या भावनांना आवर घालता आला नाही. त्यांना ओक्साबोक्सी रडताना पाहून अनेकांच्या मनाची कालवाकालव झाली होती. त्यानंतर मात्र सर्वांनीच मनावर घेतले आणि सर्वांच्या सहकार्यातून नाट्यगृहाच्या उभारणीच्या कामाला सुरुवात झाली.

दि. ९ ऑगस्ट क्रांतिदिनी कोणत्याही परिस्थितीत राखेतून नव्याने उभारणाऱ्या नाट्यगृहात दिमाखदार नाट्यप्रयोग करण्याचा चंग बांधला गेला. प्रत्येकजण कामाला लागले. राज्य सरकारने तत्काळ २५ कोटींचा निधी दिला; प्रत्येक कामात रेंगाळणाऱ्या महापालिका प्रशासनाने कामाची गती वाढवून शॉर्ट टेंडर काढून कामाला सुरुवात केली. सर्व शासकीय, महापालिका यंत्रणा, हेरिटेज कमिटी, कलाकार, लोकप्रतिनिधी अशा विविध घटकांना एकत्र बसवून नाट्यगृहाचे डिझाइन निश्चित करण्यात आले. त्यामुळे कसल्याही शंका-कुशंकांना वाव राहिला नाही. या प्रक्रियेत खासदार शाहू छत्रपती यांनी निभावलेली भूमिका महत्त्वाची होती.

नाट्यगृहाच्या कामाला सुरुवात होऊन केवळ दहा महिनेच झाले आहेत. पहिल्या टप्प्यातील भिंती मजबूत करणे, कौले घालणे, वॉटरप्रुफिंग, आदी छताचे जवळपास ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील नाट्यगृहाच्या मागील स्टेज, फुटिंग, कलादालन, मेकअपरूम, ग्रीनरूम, कॉलम टाकून वीट बांधकाम यांचे ४० टक्के काम पूर्ण झाले आहे. तिसऱ्या टप्प्यात करण्यात येणाऱ्या इंटेरिअर, विद्युतीकरण, ॲकोस्टिक, वातानुकूलित यंत्रणा, फायर फाइटिंग यांसारखी कामे करण्यासाठी वर्क ऑर्डर देण्याची प्रक्रिया सुरू आहे.

इतिहासात प्रथमच गतीने काम

‘महापालिकेचे काम म्हणजे सहा महिने थांब,’ अशी रीत झाली आहे. अनेक कामे वर्षानुवर्षे रेंगाळली आहेत; परंतु नाट्यगृहाचे कामाची प्रक्रिया झपाट्याने पूर्ण होऊन कामेही गतीने होऊ लागली आहेत. १५ मेपासून पाऊस सुरू झाला; त्यामुळे कामात अडचणी आल्या, नाही तर काम आणखी पुढे गेले असते. पालिकेच्या इतिहासात विक्रमी गती घेणारे हे पहिलेच काम आहे.

चार महिन्यांत नाट्यगृहाचे काम पूर्ण

नाट्यगृहाच्या कामाची गती पाहता संपूर्ण नाट्यगृहाचे काम पूर्ण होण्यास किमान चार ते पाच महिने लागतील, असे या कामावरील नियंत्रण अधिकारी सहायक अभियंता मिलिंद पाटील यांनी सांगितले.

ठळक बाबी

  • पहिला टप्पा कामाचे ठेकेदार - लक्ष्मी हेरिकॉन प्रा. लि., मुंबई
    कामाची किंमत - ७ कोटी ९५ लाख
  • दुसऱ्या टप्पा कामाचे ठेकेदार - व्ही. के. पाटील ॲन्ड सन्स
     कामाची किंमत - कोटी २२ लाख
  • तिसऱ्या टप्पाचे ठेकेदार ठरायचे आहेत.
    कामाची किंमत ११ कोटी ७७ लाख
    कामाचे सल्लागार - स्ट्रक्टवेल, कन्सल्टन्सी प्रा. लि.

Web Title: Work on Keshavrao Bhosale Theatre is progressing at a fast pace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.