कोल्हापूर : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी चारसदस्यीय प्रभाग रचनेचे काम पूर्ण झाले. चार सदस्यांचे १९ प्रभाग, तर एक प्रभाग पाच सदस्यांचा तयार करण्यात आला आहे. प्रशासक के.मंजुलक्ष्मी यांच्यासमवेत सोमवारनंतर होणाऱ्या बैठकीत प्रभाग रचनेवर चर्चा होऊन अंतिम केली जाणार आहे. दि. १२ ऑगस्टदरम्यान नवीन प्रभाग रचना जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केली जाईल.कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रिया गेल्या काही महिन्यांपासून सुरू करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्याचे प्रभाग रचनेचे काम नुकतेच पूर्ण झाले. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार प्रभाग रचनेचे काम करण्यात आले आहे. महापालिकेची २०२० पासून तयार करण्यात आलेली ही चौथी प्रभाग रचना आहे. यापूर्वी एक सदस्य प्रभाग रचना, ओबीसी वगळून प्रभाग रचना आणि ओबीसींसह तीनसदस्यीय प्रभाग रचना तयार करण्यात आली होती. या प्रभाग रचना प्रत्येक वेळी बाजूला ठेवण्यात आल्या. आता चौथी प्रभाग रचना चार सदस्यांची करण्याचे निर्देश देण्यात आले होते.मागच्या तीनसदस्यीय प्रभाग रचनेचा आधार घेत यावेळी चारसदस्यीय प्रभाग रचना तयार करण्यात आली आहे. त्यामुळे प्रभाग रचना तयार करताना फारसे कष्ट पडलेले नाहीत. जरी जुन्या प्रभाग रचनेचा आधार घेतला असला तरी निवडणूक आयोगाच्या निर्देशाला कुठेही धक्का पोहोचणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली. प्रभाग रचना तयार झाल्यानंतर प्रत्यक्षात भागात जाऊन अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रभागाच्या सीमारेषा, चौक, वसाहतीतील रस्ते याची शहनिशा केली. काँग्रेस पक्षाच्या माजी नगरसेवकांनी प्रभाग रचनेतील राजकीय हस्तक्षेप टाळा, अशी मागणी केल्यामुळे तर अधिकाऱ्यांनी अधिक खबरदारी घेतली होती.
कोल्हापुरात २० प्रभाग तयारकोल्हापूर शहरात २० प्रभाग तयार झाले आहेत. त्यातील १९ प्रभाग चार सदस्यांचे, तर एक प्रभाग हा पाच सदस्यांचा आहे. शेवटचा विसावा प्रभाग मतदारसंख्येने त्याचबरोबर भौगोलिक आकाराने मोठा असणार आहे. प्रत्येक प्रभागात साधारणपणे ३० ते ३५ हजार मतदार असण्याची शक्यता आहे. शेवटचा पाचसदस्यीय प्रभाग अंदाजे ४० हजार मतदारांचा असू शकतो.
अधिकारी झाले तणावमुक्तप्रभाग रचना तयार करताना अधिकारी, कर्मचाऱ्यांवर प्रचंड तणाव असतो. तीनसदस्यीय प्रभाग रचना तयार करताना एका अधिकाऱ्याच्या निष्काळजीपणाचा फटका अनेक अधिकाऱ्यांना बसला होता. त्या अधिकाऱ्यास दिलेले काम चोख झाले नसल्याने तत्कालीन प्रशासकांसह सर्व वरिष्ठ अधिकारी रात्री दोन-दोन वाजेपर्यंत जागून प्रभाग रचना तयार करत होते. त्या तुलनेत चारसदस्यीय प्रभाग रचनेचे काम अधिक सुलभ व लवकर झाल्याने अधिकारी तणावमुक्त झाले.
प्रशासक के.मंजुलक्ष्मी यांच्यासमवेत प्रभाग रचनेबाबत बैठक होईल. त्यानंतर ती प्रभाग रचनेचा मसुदा जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला जाईल. - सुधाकर चल्लावाड, निवडणूक शाखाप्रमुख.