Kolhapur- रानडुक्कराच्या हल्यात महिला जखमी, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2023 13:17 IST2023-04-08T13:08:47+5:302023-04-08T13:17:10+5:30
खोत यांनी आरडाओरडा केल्यानंतर शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेताच रानडुक्कराने डोंगराच्या दिशेने धुम ठोकली

Kolhapur- रानडुक्कराच्या हल्यात महिला जखमी, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
अनिल पाटील
सरुड : सावर्डे बुद्रुक तालुका शाहूवाडी येथे शेतात गेलेल्या महिलेवर रानडुक्कराने पाठलाग करून हल्ला केला. या हल्यात आनंदी गणपती खोत (वय ४२) जखमी झाल्या. परिसरात प्रथमच रानडुक्कराच्या हल्याची घटना घडल्याने येथील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज, शनिवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी, आनंदी खोत या शनिवारी सकाळी शेतामध्ये जात होत्या. यावेळी समोरुन एक रानडुक्कर त्यांच्या दिशेने येत असल्याचे दिसले. रानडुक्कराला घाबरुन त्या परत जात असताना रानडुक्कराने पाठलाग करून खोत यांच्यावर हल्ला केला. यावेळी खोत यांनी आरडा ओरडा केल्यानंतर शेजारील शेतामधील शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेताच रानडुक्कराने तेथून शेजारील डोंगराच्या दिशेने धुम ठोकली.
हल्यात खोत यांच्या पायला व हाताला जबर मार बसला. जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी बांबवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. वैद्यकीय उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
दरम्यान सावर्डे बुद्रुक परिसरातील डोंगर रांगेत गेल्या अनेक महिन्यापासुन रानडुक्करांचा एक कळप तळ ठोकुन आहे. या रानडुक्करांनी परिसरातील पिकांचेही मोठे नुकसान केले आहे. त्यामुळे वनविभागाने या रानडुक्करांच्या कळपाचा बंदोबस्त करावा अशी मागणी येथील शेतकऱ्यांतून होत आहे.