जयसिंगपूर : अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याचा प्रयत्न सुरू असल्याबाबत मांडण्यात आलेल्या प्रश्नावर आम्ही संपूर्ण लक्ष ठेवून आहोत. महापुरासाठी स्वतंत्र समितीची स्थापना केली आहे. त्या समितीचे काम अंतिम टप्प्यात आहे. सगळा अभ्यास करून आवश्यकता असेल तर सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी आपण करून ठेवली आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये सांगली-कोल्हापूर भागात महापुराचा धोका निर्माण होणार नाही याकरिता जे काही करावे लागेल ते करण्याचा प्रयत्न निश्चितपणे असेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.नांदणी (ता. शिरोळ) येथे पंचकल्याणक प्रतिष्ठा व महामहोत्सव महामस्तकाभिषेक सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. यावेळी माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी महापुरासोबतच पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या पुढाकाराबाबत माहिती दिली. जिल्ह्यातील पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न सोडविण्यासाठी जागतिक बँकेच्या साहाय्याने ३५० कोटी रुपयांचा निधी आपण दिला आहे. त्यामुळे येणाऱ्या काही वर्षांत पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न मिटणार आहे. तर कोल्हापूर-सांगली जिल्हादेखील पूरमुक्त होणार आहे. अशातच अलमट्टीची उंची वाढविली जात असल्याचेही मुख्यमंत्र्यांना सांगितले. हा धागा पकडून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सांगली-कोल्हापूर जिल्ह्याला भेडसावणाऱ्या महापुरापासून मुक्ती मिळावी यासाठी समिती काम करीत आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये या दोन्ही जिल्ह्यांना महापुराचा धोका निर्माण होणार नाही, यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न असणार आहेत.महापूरप्रश्नी सर्व अभ्यास करून आवश्यकता असेल तर सर्वोच्च न्यायालयात जाण्याचीही तयारी ठेवली आहे. कर्नाटकातील अलमट्टी धरणाच्या उंचीप्रश्नी मांडण्यात आलेल्या प्रश्नावर आम्ही संपूर्ण लक्ष ठेवून असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
जैन महामंडळ आणखी मजबूत करणारजयसिंगपूर : जगा आणि जगू द्या, ही शिकवण देणारा हजारो वर्षांचा इतिहास सांगणारा प्राचीन धर्म म्हणजे जैन धर्म. जैन समाजाने अहिंसा व अपरिग्रह सांगितले आहे. जगात सर्वाधिक पुण्यकार्य, दानकार्य व समाजकार्य करणारा समाज म्हणून जैन धर्माची ओळख आहे. सरकारने जैन समाजासाठी स्वतंत्र महामंडळ तयार केले आहे. मजबूत पिढी उभी करण्याचे काम या महामंडळाच्या माध्यमातून कसे करता येईल, हा प्रयत्न असणार आहेत. हे महामंडळ आणखी बळकट करू त्याला आर्थिक पाठबळ देऊ, तसेच नांदणी येथील मठाला अ वर्ग दर्जा निश्चित देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.