छत्रपती संभाजीनगरमध्ये येवून अंबादास दानवेंना उत्तर देवू : राजेश क्षीरसागर
By विश्वास पाटील | Updated: February 8, 2024 18:03 IST2024-02-08T17:44:26+5:302024-02-08T18:03:17+5:30
विरोधी पक्षनेते दानवेंनी राजेश वरपे यांच्या घरी दिली भेट, क्षीरसागरांचे कार्यकर्ते जमल्याने वातावरण तणावपुर्ण

छत्रपती संभाजीनगरमध्ये येवून अंबादास दानवेंना उत्तर देवू : राजेश क्षीरसागर
कोल्हापूर : विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कोल्हापुरात येवून लोकप्रतिनिधीचा एकेरी भाषेत उल्लेख करण्यापर्यंत त्यांची मजल गेली यावरून त्यांच्या संस्काराचे दर्शन होते. अंबादास दानवे हे जनतेतून निवडून न येता मागच्या दरवाजाने आमदार होवून विरोधी पक्षनेते बनले आहेत. त्यामुळे त्यांना जनतेच्या प्रश्नाची जाण नाही. राजकीय हेतूने अंबादास दानवे यांनी केलेल्या स्टंटबाजीस छत्रपती संभाजीनगर मध्ये येवून उत्तर देवू, असे प्रतिउत्तर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिले.
खासगी सावकारी विरोधात सर्वसामान्य कुटुंबियांना न्याय मिळवून देताना राजकीय बदनामी पोटी आखण्यात आलेल्या षड्यंत्राला विरोधी पक्ष पाठीशी घालत आहेत. राजकीय बदनामी करण्यासाठी विरोधी पक्षनेत्याला खाजगी सावकाराच्या बाजूने उभे राहून पोलीस प्रशासनाला धारेवर धरावे लागते, हे प्रथमच घडत असल्याची टीका क्षीरसागर यांनी केली आहे.
दरम्यान विरोधी पक्षनेते दानवे हे क्षीरसागर यांच्या घराच्या समोरच राहणाऱ्या राजेश वरपे यांच्या घरी जाणार असल्याने शनिवार पेठेत मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. क्षीरसागर यांचेही कार्यकर्ते जमल्याने वातावरण तणावपुर्ण बनले आहे.