Kolhapur: पत्नीला देवदर्शनाला पाठवले अन् पतीने घरातच जीवन संपवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2024 13:36 IST2024-04-23T13:36:27+5:302024-04-23T13:36:27+5:30
गडहिंग्लज : पत्नीला देवदर्शनासाठी पाठवून पतीने राहत्या घरातील तुळईला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. शिवानंद बाबू माळी (वय ३७, ...

Kolhapur: पत्नीला देवदर्शनाला पाठवले अन् पतीने घरातच जीवन संपवले
गडहिंग्लज : पत्नीला देवदर्शनासाठी पाठवून पतीने राहत्या घरातील तुळईला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. शिवानंद बाबू माळी (वय ३७, रा. हेब्बाळ कानूल, ता. गडहिंग्लज) असे मृताचे नाव आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून या घटनेमुळे हेब्बाळसह पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिस व ग्रामस्थांतून मिळालेली माहिती अशी, हेब्बाळ येथील माळी कुटुंबीय सोलापुरे गल्लीत राहते. शिवानंद हा त्याच गल्लीत पत्नी व मुलांसह स्वतंत्र राहत होता. संगणक शास्त्राच्या पदविकेनंतर तो संगणक दुरुस्तीचा व्यवसाय करीत होता.
सोमवारी (२२) सकाळी साडेसातच्या सुमारास शिवानंद याने पत्नी अश्विनी यांना देवदर्शनासाठी मंदिराकडे तर ३ वर्षांच्या लहान मुलग्याला अंघोळ घालून आजीकडे पाठवले तर ५ वर्षांचा मोठा मुलगा आजीकडेच होता. घरी कुणीही नसल्याचे पाहून त्याने राहत्या घरातील माळ्यावरील तुळईला गळफास घेतला.
दरम्यान, पत्नी घरी आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. नातेवाईक व आजूबाजूच्या नागरिकांनी त्याला उपचारासाठी तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली होती. त्याच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुलगे, भाऊ असा परिवार आहे. नरसिंग बाबू माळी यांच्या वर्दीवरून पोलिसात घटनेची नोंद झाली आहे. हवालदार अरुण पाटील अधिक तपास करीत आहेत.