Kolhapur: बाबा इंदुलकर, देसाई यांच्या प्रॉपर्टी कोठून आल्या ?, सत्यजित कदम यांची विचारणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 15:31 IST2025-07-24T15:30:55+5:302025-07-24T15:31:12+5:30
ईडीमार्फत चौकशी करा - देसाई

Kolhapur: बाबा इंदुलकर, देसाई यांच्या प्रॉपर्टी कोठून आल्या ?, सत्यजित कदम यांची विचारणा
कोल्हापूर : राज्य सरकारकडून मिळालेल्या २२ कोटींतून करावयाच्या विकासकामांना सुरुवात होण्यापूर्वीच या कामाने वेगळे वळण घेतले. ही कामे ७५ टक्के पूर्ण झाल्याचे कृती समितीचे बाबा इंदुलकर व दिलीप देसाई यांनी प्रशासकांच्या निदर्शनास आणून देताच माजी नगरसेवक सत्यजित कदम यांनी या दोघांच्या प्रॉपर्टी कशा वाढल्या, याची माहिती घेऊन महिन्याभरात कोल्हापूरच्या जनतेसमोर मांडण्याचा इशारा दिला.
सत्यजित कदम यांनी राज्य सरकारकडून २२ कोटींचा निधी आणला असून, त्याची निविदा प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया सुरू असतानाच कॉमन मॅन व कृती समितीच्यावतीने प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांना पत्र देऊन यातील ७५ टक्के कामे पूर्ण झाली असून, यादी तपासून पाहण्याची मागणी केली. त्यानंतर या प्रकरणाला वेगळे वळण लागले.
बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना कदम यांनी इंदुलकर, देसाई यांची प्रॉपर्टी इतकी कशी वाढली? असा सवाल उपस्थित करत सर्व माहिती संकलित करून ती कोल्हापूरच्या जनतेसमोर मांडणार असल्याचे सांगितले. या दोघांनी वेगवेगळे पट्टे गळ्यात घातले. वेगवेगळ्या पक्षात काम केले आहे. बाबा इंदुलकर नोकरी करत होते, तेथून पळून का गेले..? तुमचा व्यवसाय काय? तुमची उंची काय..? बोलता काय..? असे प्रश्न विचारत कदम यांनी माहितीच्या अधिकारात अर्ज करण्याचा त्यांनी बिझनेस सुरू केला असून, त्याच्या माहितीचा पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.
देसाई यांनी कोणत्या कार्यालयात किती माहितीचे अर्ज दिले. मुलगा कुठे शिकतो. त्यांनी प्रॉपर्टी कोठून गोळा केली, याची माहिती घेत असल्याचे कदम यांनी सांगितले. पुढील महिन्याभरात ही सर्व माहिती जनतेसमोर ठेवणार असल्याचे कदम यांनी सांगितले.
माझ्यावर कितीही आरोप केले तरी मी माझ्या तत्त्वाशी ठाम आहे. माहितीच्या अधिकारात माहिती मागवली तरी त्याचा वापर योग्य कारणासाठीच केला आहे. ४५० एकर जमीन सरकार जमा करण्यास भाग पाडले आहे. माझी काेणतीही मिळकत बेनामी नाही. कदम यांनी ईडी, सीबीआयसारख्या यंत्रणांमार्फत आमची चौकशी करावी. त्यांच्या इशाऱ्याचे स्वागतच करतो. - दिलीप देसाई, प्रजासत्ताक संस्था, कोल्हापूर
कदम यांनी केलेले आरोप सिद्ध करून दाखवावेत. काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगडफेक करू नये. महापालिकेकडे आम्ही काय खोटी तक्रार केली होती, ते दाखवून द्यावे. आम्ही जी तक्रार केली त्यावर कदम यांनी बोलावे. - बाबा इंदुलकर, अध्यक्ष, कॉमन मॅन संघटना