स्थगिती दिली नाही ना, मग निधी कुठे गेला?, स्मृतिशताब्दी वर्षातच शाहू समाधी स्मारकाची सरकारकडून उपेक्षा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2022 17:21 IST2022-10-12T17:21:10+5:302022-10-12T17:21:39+5:30
शाहू महाराज यांच्या स्मृतिशताब्दी वर्षातच त्यांच्या समाधी स्मारकाची होत असलेली अवहेलना तमाम शाहूप्रेमींचा अवमान करणारी आहे.

स्थगिती दिली नाही ना, मग निधी कुठे गेला?, स्मृतिशताब्दी वर्षातच शाहू समाधी स्मारकाची सरकारकडून उपेक्षा?
भारत चव्हाण
कोल्हापूर : नर्सरी बागेत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाला तसेच खर्चाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळाली, खर्च कोणत्या बजेट हेडमधून करायचा, याचेही निर्देश झाले; परंतु चार महिने होऊन गेले या कामाला अद्याप सुरुवात झाली नाही. जर निधी मंजूर असेल तर मग तो कोठे गेला, कामाला सुरुवात का केली जात नाही? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.
शाहू महाराज यांच्या स्मृतिशताब्दी वर्षातच त्यांच्या समाधी स्मारकाची होत असलेली अवहेलना तमाम शाहूप्रेमींचा अवमान करणारी आहे. रोज उठता बसता राजर्षींचे नाव घेणारे राज्यकर्ते सत्तेच्या सारिपाटावर स्वत:च्या खुर्च्या राखण्याचाच प्रयत्न करत आहेत. शाहू समाधी स्थळाच्या दुसऱ्या टप्प्यातील ९ कोटी ४० लाख ५६ हजार १०८ इतक्या किमतीच्या कामाला तसेच अंदाजपत्रकास दि. २८ जून रोजी शासनाची मान्यता प्रदान करण्यात आली. राज्यात सत्तांतर होताच मागच्या सरकारच्या सर्व निर्णयांना स्थगिती देण्यात आली. त्यात समाधी स्मारकाच्या कामाला फटका बसला.
‘लोकमत’ने उठविला आवाज
राज्य सरकारने मागच्या सर्व निर्णयांना स्थगिती देण्याच्या निर्णयामुळे शाहू समाधीच्या कामास फटका बसल्याचे ‘लोकमत’ने समोर आणले. जन्मशताब्दी वर्षातच स्मारकासाठीचा निधी रोखल्याचे वृत्त ३ ऑगस्ट २०२२ च्या अंकात दिले. त्यावेळी खडबडून जागे झालेल्या समाज कल्याण विभागाने ५ ऑगस्टला ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधी स्मारकाच्या कामास स्थगिती द्यावी; अथवा काम थांबविण्यात यावे, याबाबत शासन स्तरावरून कोणतेही निर्देश प्राप्त झालेले नाहीत, असा खुलासा सहायक आयुक्त सचिन साळे यांनी केला. मग मंजूर झालेला निधी कुठे गेला ? कामाला कधी सुरुवात होणार, असे प्रश्न आता उपस्थित झाले आहेत. अध्यादेश निघून चार महिने झाले; परंतु काम एक इंचही पुढे सरकलेले नाही.
झोळी पसरणारेही थंड
दुर्दैव असे की, १५ ऑगस्टपूर्वी निधी उपलब्ध करून न दिल्यास कोल्हापूर बंद करू, असा इशारा देत समाधी स्मारकासाठी जनतेपुढे झोळी पसरणाऱ्या शिवसैनिकांचेही त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. समाधी स्मारकाचा निधी रोखल्यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी शहरात जनतेपुढे झोळी पसरून निधी संकलन केला; पण आंदोलन झाले, नंतर सगळेच थंड झाले.