राजू शेट्टींनी ५०० एकर शेती घेतली त्याचे काय?, राजेश क्षीरसागर यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 18:07 IST2025-07-22T18:06:38+5:302025-07-22T18:07:07+5:30
मी आधीही शेतकरी नव्हतो आणि आताही नाही. परंतु..

राजू शेट्टींनी ५०० एकर शेती घेतली त्याचे काय?, राजेश क्षीरसागर यांचा सवाल
कोल्हापूर : स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीसाठी शिंदेसेनेला पोषक वातावरण असून, अनेक जण पक्ष प्रवेशास इच्छुक आहेत. यात एक मोठा बॉम्ब लवकरच फुटणार आहे, असे संकेत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी सोमवारी दिले. शिंदे सेनेत लवकरच हे पक्ष प्रवेश होतील, असेही त्यांनी सांगितले.
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष क्षीरसागर यांनी सोमवारी ‘लोकमत’च्या शहर कार्यालयास सदिच्छा भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. क्षीरसागर यांनी ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी ‘लोकमत’चे संस्थापक संपादक स्वर्गीय जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी हर्षल सुर्वे, माजी नगरसेवक रमेश पुरेकर उपस्थित होते.
शिंदेसेनेत काही दिवसांपूर्वी २२ माजी नगरसेवकांनी पक्षप्रवेश केले होते. पक्ष प्रवेश संपले का? असे विचारले असता क्षीरसागर यांनी सांगितले की, शिंदे सेनेत येण्यास निवडून येण्याची क्षमता असलेले अनेक जण इच्छुक आहेत. त्याची नावे लवकरच समजतील. त्यात काही मोठे बॉम्ब फुटणार आहेत.
शक्तिपीठ महामार्ग आंदोलनावरून राजेश क्षीरसागर शेतकरी आहेत का, त्यांची शेती आहे का? असे प्रश्न आंदोलनकर्त्यांकडून उपस्थित केले जात आहेत, याकडे लक्ष वेधले असता, क्षीरसागर यांनी सांगितले की, मी आधीही शेतकरी नव्हतो आणि आताही नाही. परंतु, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे २०४७ सालचे विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी असे प्रकल्प होणे अत्यावश्यक आहे. म्हणून मी यासाठी आग्रही आहे. परंतु, माझ्यावर उठसूठ आरोप करणारे राजू शेट्टी यांनी ५०० एकर शेती घेतली त्याचे काय? असाही सवाल त्यांनी केला.