तुमचा खेळ थोड्या दिवसांचा; आदित्य ठाकरेंचा क्षीरसागरांसह, दोन्ही खासदारांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 01:31 PM2024-01-10T13:31:40+5:302024-01-10T13:32:06+5:30

'जे गद्दार स्वत:ला विकू शकतात ते उद्या राज्यालाही विकतील'

We will show strength when our government comes, Shiv Sena leader Aditya Thackeray's warning to Rajesh Kshirsagar and both MPs | तुमचा खेळ थोड्या दिवसांचा; आदित्य ठाकरेंचा क्षीरसागरांसह, दोन्ही खासदारांना इशारा

तुमचा खेळ थोड्या दिवसांचा; आदित्य ठाकरेंचा क्षीरसागरांसह, दोन्ही खासदारांना इशारा

कोल्हापूर : इथल्या दोन्ही खासदार आणि नेत्यांनी बोट दाखवले त्यासाठी निधी दिला. काय कमी केलं होतं यांच्यासाठी म्हणून यांनी गद्दारी केली? पण हा तुमचा खेळ थोड्या दिवसांचा आहे. आमचं सरकार आल्यावर ताकद दाखवू, असा इशारा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी राजेश क्षीरसागर आणि दोन्ही खासदारांना त्यांचे नाव न घेता दिला.

मिरजकर तिकटी येथील सभेत मंगळवारी रात्री ते बोलत होते. यावेळी खासदार अनिल देसाई, आमदार वैभव नाईक, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

ठाकरे म्हणाले, २०१९ मध्ये आपण महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. सर्व क्षेत्रात आणि जिल्ह्यात प्रगती करत होतो. कोरोना, अवकाळी, गारपीट अनेक संकटं आली; परंतु उद्धव ठाकरे यांनी या संकटातून महाराष्ट्राला बाहेर काढलं. आमचं चांगलं चाललेलं सरकार यांनी खोक्यांनी आणि धोक्यांनी पाडलं. पाठीत खंजीर खुपसला.

भाजपनं दोन पक्ष फोडून सरकार बनवलं. मात्र, माझं राज्य मागे चाललंय. यांचे सरकार आल्यापासून नवे उद्योग यायचे राहू दे आलेले उद्योगही गुजरातेत नेले गेले. एक लाख रोजगार देणारा वेदांता उद्योग गुजरातला पळवला. क्रिकेटचा वर्ल्डकपचा सामनाही तिकडे पळवला. एकीकडे उद्योग पळवले. दुसरीकडे शेतकरी हैराण आहेत आणि ज्याला एक खातं सांभाळता येत नाही तो मुख्यमंत्रिपदावर आहे. हे असलं सरकार महाराष्ट्राला परवडणारं नाही. हे रिव्हर्स गीअरचे सरकार आहे. हे सगळे थोतांड आहे. खोटारडे आहेत. जे गद्दार स्वत:ला विकू शकतात ते उद्या राज्यालाही विकतील. या महाराष्ट्रानं यांचं काय बिघडवलंय म्हणून हा अन्याय सुरू आहे.

उपनेते नितीन बानगुडे पाटील म्हणाले, जरी ४० गद्दार गेले असले तरी शिवसेनेचा टवकाही उडाला नाही. १४० निवडून आणू. महाराष्ट्र अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू असताना ‘कुठं नेऊन ठेवलाय माझा महाराष्ट्’र असे विचारण्याची आता वेळ आली आहे.

जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले, टक्केवारीचं शहर म्हणून कोल्हापूरची बदनामी करणारा टक्केवारीचा राजा इथं जन्माला आला आहे. यांच्या कॉइन बॉक्समध्ये कॉइन पडल्याशिवाय काम सुरू होत नाही. दोन खासदार आणि पाच आमदार दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.

यावेळी विजय देवणे, प्रतिज्ञा उत्तुरे, कमलाकर जगदाळे, विशाल देवकुळे यांची भाषणे झाली. माजी आमदार संजयबाबा घाटगे, सुरेश साळोखे, सुजित मिणचेकर, सत्यजित पाटील, सुनील मोदी, रवी इंगवले, शुभांगी पोवार, स्मिता सावंत, मंजित माने यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

इकडं एक कॅरेक्टर आहे

क्षीरसागर यांचे नाव न घेता ठाकरे म्हणाले, इथं एक कॅरेक्टर आहे. कुणाच्या तरी घरात जाऊन मारहाण करून आलं आहे. मला माहिती आहे पोलिसांचे हात बांधले गेले आहेत. एवढी मस्ती आली कुठून ही मस्ती पाकिस्तानात जाऊन दाखवा.

चेतन नरके व्यासपीठावर

ठाकरे यांच्या या सभेला लोकसभेसाठी शिवसेनेकडून इच्छुक असलेले चेतन नरके हे देखील व्यासपीठावर उपस्थित होते. नरके यांच्या निवासस्थानी ठाकरे यांनी सभेआधी भेट दिली. त्यामुळे नरके यांच्या उमेदवारीची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे.

Web Title: We will show strength when our government comes, Shiv Sena leader Aditya Thackeray's warning to Rajesh Kshirsagar and both MPs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.