कोल्हापुरात गुरुकुल, गोशाळा उभारण्यासाठी निधी देऊ : उपमुख्यमंत्री शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 13:22 IST2025-05-16T13:21:25+5:302025-05-16T13:22:11+5:30

शिये येथे वारकरी संप्रदाय कार्यक्रम संपन्न

We will provide funds to build Gurukul and Gaushala in Kolhapur says Deputy Chief Minister Eknath Shinde | कोल्हापुरात गुरुकुल, गोशाळा उभारण्यासाठी निधी देऊ : उपमुख्यमंत्री शिंदे

कोल्हापुरात गुरुकुल, गोशाळा उभारण्यासाठी निधी देऊ : उपमुख्यमंत्री शिंदे

शिरोली/ शिये : कोल्हापुरात गुरुकुल, गोशाळा उभारण्यासाठी आणि नंदवाळला भक्तनिवास, रिंगण सोहळ्यासाठी निधी देऊ, असे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. ते करवीर तालुक्यातील शिये गावात ह.भ.प. गुरुवर्य आप्पासाहेब वासकर महाराज बहुउद्देशीय सामजिक संस्था, कोल्हापूर संचलित ह.भ.प. गुरुवर्य विवेकानंद वासकर महाराज अध्यात्मिक व शैक्षणिक गुरुकुल कोल्हापूर आयोजित व विठ्ठल भजनी मंडळ, शिये यांच्या सहकार्यातून आयोजित वारकरी संमेलन व शियेतील वारकरी बालसंस्कार शिबिराच्या सांगता समारंभात ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिये गावच्या सरपंच शीतल कदम होत्या तर पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धैर्यशील माने, आमदार चंद्रदीप नरके, राणू महाराज वासकर प्रमुख उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे टाळ-मृदंगाच्या गजरात आणि फुलांची उधळण करत स्वागत करण्यात आले. यावेळी राणू महाराज वासकर यांनी कोल्हापुरातील मार्केट यार्ड येथे गुरुकुल आणि गोशाळा उभारण्यासाठी निधी द्यावा, अशी मागणी केली तसेच करवीरचे आमदार चंद्रदीप नरके यांनी नंदवाळ हे ‘प्रति पंढरपूर’ म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी आषाढी वारीला मोठ्या प्रमाणात वारकरी येतात, या ठिकाणी पंढरपूरच्या धर्तीवर भक्तनिवास आणि रिंगण सोहळ्यासाठी निधी द्यावा, अशी मागणी केली.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, महाराष्ट्र ही संतांची शूरवीरांची भूमी आहे. शिये येथे वारकरी बालसंस्कार शिबिरात येण्याचे भाग्य मला मिळाले आणि वारकरी संप्रदायाचे दर्शन झाले. पांडुरंगाच्या आशीर्वादाने राज्याला पुढे घेऊन जात आहे.

कोल्हापूर येथे गुरुकुल उभारण्यासाठी आणि गोशाळा उभारण्यासाठी तसेच नंदवाळला भक्तनिवास बांधण्यासाठी नगरविकास खात्याकडे प्रस्ताव द्या आपण निधी देऊ, असेही शिंदे म्हणाले. आम्ही राज्यकर्ते असलो, तरी आमच्यापेक्षा वारकरी संप्रदाय , धार्मिक, संत परंपरा ही खूप मोठी आहे. तसेच लाडक्या बहिणींना नाराज करणार नाही. लाडकी बहीण योजना मी असेपर्यंत बंद होणार नाही, असेही ते म्हणाले. 

कार्यक्रमाला पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धैर्यशील माने, माजी खासदार संजय मंडलिक, आमदार चंद्रदीप नरके, राजेश क्षीरसागर, अशोकराव माने, माजी आमदार प्रकाश आवाडे. मंगेश चिकटे, कौस्तुभ महाराज वासकर, चैतन्य महाराज देहुलकर, मंगलगिरी महाराज, विठ्ठल महाराज चावरे, भागवत हांडे महाराज, माधवदास राठी महाराज, अक्षय भोसले, ज्ञानेश्वर महाराज, हृषिकेश वासकर महाराज उपस्थित होते.

Web Title: We will provide funds to build Gurukul and Gaushala in Kolhapur says Deputy Chief Minister Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.