कर्नाटकच्या वाहनांवर आम्हालाही बंदी घालावी लागेल, पालकमंत्री सतेज पाटील यांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 19:42 IST2021-02-22T19:40:37+5:302021-02-22T19:42:26+5:30
Satej Gyanadeo Patil Kolhapur-कोरोनाला प्रतिबंध करायचा म्हणून कर्नाटक सरकारने कोगनोळी नाक्यावर महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांवर बंदी घालणे योग्य नाही. अन्यथा आम्हालाही तेथील प्रवासी आणि वाहनांवर बंदी घालावी लागेल, असा इशारा पालकमंत्री सतेज पाटील यांनी सोमवारी दिला. या प्रश्नात केंद्राने हस्तक्षेप करण्याची मागणी करत त्यांनी कर्नाटकने जबाबदारी दुसऱ्यांवर ढकलण्याऐवजी स्वत: नाक्यावर आरटीपीसीआर चाचणी केंद्र उभारावे, असे आवाहनही त्यांनी केले.

कर्नाटकच्या वाहनांवर आम्हालाही बंदी घालावी लागेल, पालकमंत्री सतेज पाटील यांचा इशारा
कोल्हापूर : कोरोनाला प्रतिबंध करायचा म्हणून कर्नाटक सरकारने कोगनोळी नाक्यावर महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांवर बंदी घालणे योग्य नाही. अन्यथा आम्हालाही तेथील प्रवासी आणि वाहनांवर बंदी घालावी लागेल, असा इशारा पालकमंत्री सतेज पाटील यांनी सोमवारी दिला. या प्रश्नात केंद्राने हस्तक्षेप करण्याची मागणी करत त्यांनी कर्नाटकने जबाबदारी दुसऱ्यांवर ढकलण्याऐवजी स्वत: नाक्यावर आरटीपीसीआर चाचणी केंद्र उभारावे, असे आवाहनही त्यांनी केले.
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने गेल्या चार दिवसांपासून कर्नाटक सरकारने कोगनोळी टोलनाक्यावर चेक पोस्ट उभारले आहे. येथे महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांना अडवून प्रवाशांना कोरोना चाचणी निगेटिव्ह असल्याने प्रमाणपत्र मागितले जात आहे. प्रमाणपत्र नसलेल्या नागरिकांना राज्यात प्रवेश दिल जात नसल्याने प्रवाशांची मोठी तारांबळ होत आहे.
या पार्श्वभूमीवर मंत्री पाटील म्हणाले, लांब पल्ल्याचा प्रवास करून आलेल्या नागरिकांंवर बंदी घालणे योग्य नाही. लोक सीमेवर येऊन थांबत आहेत, त्यांची तारांबळ होत आहे. या प्रवाशांची कोल्हापुरात आरटीपीसीआर चाचणी केली जावी, असे कर्नाटक सरकारचे म्हणणे आहे; पण मुंबईत जगभरातील नागरिक येतात, त्यांची जबाबदारी मुंबई महापालिकेने घेतली.
प्रवाशांची चाचणी करून त्यांना क्वारंटाईन केले जाते. त्याचप्रमाणे कर्नाटकने आपली जबाबदारी महाराष्ट्रावर न ढकलता स्वत: आरटीपीसीआर चाचणी केंद्र उभारावे व नागरिकांना सात दिवस क्वारंटाईन करावे. सध्या आमचे कर्नाटक सरकारशी बोलणे सुरू आहे. काही तोडगा न निघाल्यास आम्हालाही तेथील वाहने व प्रवाशांवर बंदी घालावी लागेल.