‘राजाराम’चा पाणीपुरवठा खंडित

By Admin | Updated: April 21, 2015 00:59 IST2015-04-21T00:59:18+5:302015-04-21T00:59:31+5:30

वीजजोडणी आज तोडणार; पंचगंगा प्रदूषणप्रकरणी कारवाई

Water supply of 'Rajaram' breaks | ‘राजाराम’चा पाणीपुरवठा खंडित

‘राजाराम’चा पाणीपुरवठा खंडित

कोल्हापूर : पंचगंगा नदीच्या प्रदूषणास कारणीभूत ठरलेल्या राजाराम सहकारी साखर कारखान्याचा पाणीपुरवठा सोमवारी सायंकाळी जलसंपदा विभागाने खंडित केला. कारखान्याच्या इतिहासात अशाप्रकारची कारवाई पहिल्यांदाच होत आहे. इचलकरंजीतील नऊ प्रोसेसर्सचे वीज व पाणीपुरवठा तोडण्याची कारवाई आज, मंगळवारी होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य डॉ. पी. अनबालगन यांनी सक्त आदेश दिल्यानंतर महावितरण व जलसंपदा विभागाचे कर्मचारी कारवाई करण्यासाठी सज्ज झाले आहेत. पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्याची तसेच त्या अनुषंगाने सर्व उपाययोजना करण्याची जबाबदारी मुंबई उच्च न्यायायलाने विभागीय आयुक्त एस. चोकलिंगम यांच्यावर सोपविली आहे. शनिवारी कोल्हापुरात झालेल्या पंचगंगा नदी प्रदूषण आढावा बैठकीनंतर चोकलिंगम यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य डॉ. पी. अनबालगन यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर काही तासांत अनबालगन यांनी नदीचे प्रदूषण करणाऱ्या घटकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. हे आदेश सोमवारी महावितरण व जलसंपदा विभागाला मिळाले. ‘महावितरण’चे अधीक्षक अभियंता दीपक कुमठेकर यांनी या आदेशानुसार सोमवारी कोल्हापूर विभागाचे कार्यकारी अभियंता सतीश राजदीप व इचलकरंजी विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक शिंदे यांना राजाराम साखर कारखाना व इचलकरंजीतील प्रोसेसर्स सावंत, रघुनंदन, राधामोहन, राधा कन्हैया, लक्ष्मी को-आॅपरेटिव्ह, हरिहर को-आॅपरेटिव्ह, डेक्कन को-आॅपरेटिव्ह, यशवंत को-आॅपरेटिव्ह, अरविंद कॉटसीन, आदींवर कारवाई करण्याचे आदेश दिले. सर्व संबंधितांना चोवीस तासांची नोटीस देऊन मंगळवारी ही कारवाई करण्यात येईल, असे ‘महावितरण’कडून सांगण्यात आले. पंचगंगा नदी प्रदूषणाची मुंबई उच्च न्यायालयाने गांभीर्याने दखल घेत सर्वच यंत्रणांना फटकारले आहे. त्यामुळे राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ खडबडून जागे झाले आहे. त्यांनी पाणी, वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. एकाच वेळी नऊ प्रोसेसर्सवर अशी कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ आहे. (प्रतिनिधी)


इचलकरंजीतील नऊ प्रोसेसर्सचाही पाणीपुरवठा तोडणार
प्रदूषण नियंत्रण मंडळाची नोटीस जलसंपदा विभागाला मिळाली असल्याचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी सांगितले. राजाराम साखर कारखाना हे आपले ग्राहक असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार सायंकाळी त्यांचा पाणीपुरवठा खंडित करून यंत्रणा सील करण्यात आली आहेत. इचलकरंजीमधील नऊ प्रोसेसर्स हे आपले ग्राहक नसले तरी नगरपालिकेला पत्र लिहून त्यांचे पाणी कनेक्शन तोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Web Title: Water supply of 'Rajaram' breaks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.