अठरा दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा

By Admin | Updated: June 28, 2014 00:47 IST2014-06-28T00:44:39+5:302014-06-28T00:47:31+5:30

जिल्हाधिकारी : मुख्यमंत्र्यांनी ‘व्हीसी’वरून घेतला आढावा

Water storage as much as twenty-eight days | अठरा दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा

अठरा दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा

कोल्हापूर : जिल्ह्यात सध्या ६ टी.एम.सी. इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. यापैकी ३ टी.एम.सी. पाणी १५ जुलैपर्यंत शेती आणि पिण्यासाठी वापरले जाऊ शकते. जुलै महिन्यातही पावसाने दडी मारल्यास उर्वरित पाणी फक्त पिण्यासाठी वापरले जाऊ शकते, अशी माहिती जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी आज, शुक्रवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना दिली. त्यामुळे पाण्याची काटकसर करण्याची गरज असून नागरिकांनी गांभीर्याने पाहण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
मुख्यमंत्र्यांनी आज राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पाणीसाठ्याचा व पीक परिस्थितीचा आढावा घेऊन योग्य त्या सूचना दिल्या. पावसाने मारलेली दडी लक्षात घेता, मुख्यमंत्र्यांनी ही बाब चांगलीच गांभीर्याने घेतली आहे. आज राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला.
जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्ह्यातील उसाची परिस्थिती चांगली आहे; परंतु भाताची पिके अडचणीत आहेत. सध्या ३३ टक्के इतक्याच पेरण्या झाल्या आहेत. भात पिकाच्या ३२ हजार हेक्टर क्षेत्राच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. गतवर्षी या काळात ९० हजार हेक्टरमध्ये पेरण्या झाल्या होत्या. सोयाबीनच्या ६ हजार हेक्टरपर्यंत पेरण्या झाल्या असून गतवर्षी त्या या काळात ४५ हजार हेक्टरपर्यंत झाल्या होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांवर पेरणीचे संकट ओढविण्याची शक्यता आहे. तृणधान्याची पेरणी अद्याप झालेली नाही.
जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती घेतल्यानंतर पिके वाचविण्यासाठी तातडीने उपाययोजना करा. बंधाऱ्यांना बरगे घालून पाणी आडवा, अशा महत्त्वपूर्ण सूचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. (प्रतिनिधी)
पालकमंत्र्यांच्या छायाचित्रास काळे फासले
टोलविरोधी कृती समितीचे आंदोलन : शाहूप्रेमींचे आवाहन धुडकावून कोल्हापूरला आल्याने संताप
कोल्हापूर : कोल्हापूरचा टोल प्रश्न सोडविण्यास शासन अपयशी ठरले. राज्य शासनाचे प्रतिनिधी असलेले पालकमंत्री हर्षवर्धन पाटील हे निष्क्रिय आहेत. त्यामुळे पालकमंत्र्यांनी शाहू जयंतीला उपस्थित राहू नये, असे शाहूप्रेमींनी आवाहन केले होते तरीही पालकमंत्री कोल्हापुरात आले. त्याचा निषेध म्हणून टोलविरोधी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी आज, शुक्रवारी दसरा चौकात त्यांच्या छायाचित्रास काळे फासले. त्यांच्या विरोधात बोंब मारून निषेधाच्या घोषणा दिल्या.
कोल्हापूरकर गेली चार वर्षे टोलविरोधी आंदोलन करत असूनही राज्य शासन ठोस निर्णयाप्रत पोहोचत नाही. राज्य शासनाने प्रतिनिधी म्हणून पालकमंत्री हर्षवर्धन पाटील सपशेल अपयशी ठरले आहेत. राजर्षी शाहू जयंतीच्या अगोदर दोन दिवस शाहूप्रेमींनी पालकमंत्र्यांना कोल्हापुरात न येण्याचे आवाहन केले होते तरीही पालकमंत्र्यांनी शाहू जयंतीला उपस्थिती दर्शविली. ‘कोल्हापूरच्या प्रश्नांची जाण नसणाऱ्या पालकमंत्र्यांचा धिक्कार असो’ असे म्हणत दसरा चौकात कार्यकर्त्यांनी त्यांच्या नावाने बोंबही मारली.
तत्पूर्वी महिला कार्यकर्त्या दीपाताई पाटील, वैशाली महाडिक, सुजित चव्हाण, विजया फुले यांनी शाहू पुतळा परिसर झाडून साफ केला. त्यानंतर कार्यकर्त्यांनी गोमूत्र शिंपडून परिसर पवित्र केला. पुतळ्यास फुले वाहून अभिवादन केले. त्यानंतर पुतळ्याच्या समोर पालकमंत्र्यांच्या छायाचित्रास कार्यकर्त्यांनी काळी शाई लावली.
पालकमंत्री इशारे देऊनही हजर राहिले. शाहू जयंतीला गालबोट नको म्हणून यादिवशी कार्यकर्ते शांत राहिले. अपमानजनक परिणामाची जबाबदारी पालकमंत्र्यांची राहील, असे यापूर्वीच बजावले होते तरीही ते हजर राहिले. निष्क्रिय पालकमंत्र्यांचा आम्ही निषेध करतो, अशी प्रतिक्रिया टोलविरोधी कृती समितीचे सदस्य अशोक पोवार यांनी दिली.
यावेळी संभाजी जगदाळे, रामभाऊ चव्हाण, बाबा पार्टे, सतीशचंद्र कांबळे, जी. एस. पाटील, रघु कांबळे, गणी आजरेकर, जयकुमार शिंदे, दिलीप पवार, किशोर घाटगे, गौरव लांडगे यांच्यासह अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Water storage as much as twenty-eight days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.