corona virus : ऐन गणेशोत्सवात सातवणे गावकऱ्यांचा इशारा, गावात याल तर ५०० चा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 14:01 IST2020-08-25T13:55:59+5:302020-08-25T14:01:19+5:30
लोकशाहीत कुणालाही कुठेही संचार करण्याची मुभा आहे. परंतु, आमच्या गावात याल तर ५०० रूपये दंड द्यावा लागेल, असा इशारा चंदगड तालुक्यातील सातवणे ग्रामस्थांनी दिला आहे. कोरोनापासून गाव सुरक्षित ठेवण्यासाठी ऐन गणेशोत्सवात सातवणेकरांनी घेतलेल्या निर्णयाची चर्चा केवळ कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यभर सुरू आहे.

दरवर्षी देखावे पाहण्यासाठी चंदगड तालुक्यातील सातवणे गावातील रस्ते गर्दीने फुलून जातात. परंतु, कोरोनामुळे यंदा गावकऱ्यांनीच बाहेरच्या लोकांना प्रवेश बंदी केल्याने ऐन गणेशोत्सवात गावात असा शुकशुकाट आहे.
राम मगदूम
गडहिंग्लज : लोकशाहीत कुणालाही कुठेही संचार करण्याची मुभा आहे. परंतु, आमच्या गावात याल तर ५०० रूपये दंड द्यावा लागेल, असा इशारा चंदगड तालुक्यातील सातवणे ग्रामस्थांनी दिला आहे. कोरोनापासून गाव सुरक्षित ठेवण्यासाठी ऐन गणेशोत्सवात सातवणेकरांनी घेतलेल्या निर्णयाची चर्चा केवळ कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यभर सुरू आहे.
हकीकत अशी, सातवणे हे गडहिंग्लज-चंदगड राज्यमार्गावरील ३८० उंबऱ्याच, १६०० लोकवस्तीच गाव. देखाव्यांचे गाव म्हणून हे गाव प्रसिद्ध आहे. दरवर्षी गणेशोत्सवात येथील प्रत्येक घरात गणपतीचा सुंदर आरास व ज्वलंत प्रश्नांसह ऐतिहासिक प्रसंगावर सजीव देखावे साकारले जातात. त्यामुळे दरवर्षी सीमाभागातील गणेशभक्त देखावे पाहण्यासाठी याठिकाणी गर्दी करतात.
दरम्यान, गेली ५ महिने देशभर कोरोनाचा धुमाकूळ सुरू आहे. दिवसागणिक रूग्णांची संख्या वाढते आहे. परंतु, सातवणेकरांनी अद्याप कोरोनाला गावात प्रवेश करू दिलेला नाही. त्यामुळे देखावे पाहण्यासाठी बाहेरून येणाऱ्यांच्या संपर्कामुळे गावातील नागरिकांना संसर्ग होवू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्थीपर्यंत बाहेर गावच्या माणसांनी सातवणे गावात प्रवेश केला तर त्याच्याकडून ५०० रूपये दंड वसूल करण्यात येणार आहे. एवढेच नव्हे तर गावचा नियम मोडून कुणी गावात आल्यास त्याच्याविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
कोरोनाचा संसर्ग आणि फैलाव टाळण्यासाठी सरकारने देशात संचारबंदी आणि लॉकडाऊनची अंमलबजावणी केली. त्यानंतर टप्या-टप्याने अनलॉकची प्रक्रियादेखील सुरू झाली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आंतरराज्य बसफेऱ्याही सुरू झाल्या. परंतु, कोरोनाला वेशीवरच रोखण्यासाठी ऐन गणेशोत्सवात गावबंदीचा निर्णय घेवून सातवणेकरांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
दरवर्षी सातवणेमधील देखावे पाहण्यासाठी हजारो लोक येतात. परंतु, यावर्षी सगळीकडे कोरोनाचा थैमान सुरू आहे. देखावे पाहण्यासाठी होणाऱ्या गर्दीमुळे गावातील नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नाकरता येत आहे. त्यामुळे यावर्षी साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचा आणि बाहेरच्या लोकांना गावात प्रवेश न देण्याचा निर्णय गावकऱ्यांनी एकमताने घेतला आहे.
- रामभाऊ पारसे,
सरपंच सातवणे, ता. चंदगड.