वारणा दूध संघ उत्पादकांच्या प्रतिजनावरांसाठी ५० हजारांचे विमा संरक्षण देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:26 IST2021-09-18T04:26:00+5:302021-09-18T04:26:00+5:30
वारणानगर : वारणा दूध संघामार्फत दूध उत्पादकांच्या प्रतिजनावरांसाठी ५० हजारांची विमा संरक्षण योजना राबविणार असून, भारतातील ही पहिली अभिनव ...

वारणा दूध संघ उत्पादकांच्या प्रतिजनावरांसाठी ५० हजारांचे विमा संरक्षण देणार
वारणानगर : वारणा दूध संघामार्फत दूध उत्पादकांच्या प्रतिजनावरांसाठी ५० हजारांची विमा संरक्षण योजना राबविणार असून, भारतातील ही पहिली अभिनव योजना असल्याचे सांगून म्हैसांना व मुऱ्हा जातीच्या रेडी संगोपनासाठी ३० हजार रुपये अनुदान देणार असल्याची घोषणा वारणा दूध संघाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांनी सभेत केली.
येथील वारणा सहकारी दूध संघाची ५३वी ऑनलाइन वार्षिक सभा वारणा शिक्षण संकुलात झाली. दूध उत्पादक शेतकरी व दूध संघ यांच्यातील समन्वयासाठी ‘वुई वारणा’ या वारणा दूध संघाच्या नवीन ॲपचे उद्घाटन आमदार कोरे यांच्या हस्ते झाले.
अध्यक्ष कोरे म्हणाले, वारणा दूध संघाने शेतकरी उत्पादकांचे कायमच हित पाहिले. उत्पादकांच्या दोन जनावरांसाठी विमा कवच योजना राबविणार असून, दूध उत्पादकांचे प्रतिजनावरांकरिता रुपये २५० या प्रमाणे दोन जनावरांसाठी ५०० रुपये व दूध संघ ५०० रुपये अशी १००० रु. विमा रकमेतून जनावरे दगावल्यास प्रतिजनावरास ५० हजार रुपये संरक्षण देणार आहे. दूध उत्पादकांनी म्हैसांना व मुऱ्हा जातीच्या रेडीचे संगोपन करून ती रेडी पहिल्या वेतास व्ह्याल्यास त्यापोटी ३० हजार रु. व दुसऱ्या वेतास १५ हजार, तर देशी गायीस संगोपन केल्यास १५ व ७ हजार रु. दोन वेतास अनुदान देण्यात येणार आहे.
वारणा दूध संघाने कोरोनाच्या महामारीत अहवाल सालात ९३४ कोटींची वार्षिक उलाढाल करून ६४ कोटी ३९ लाख रुपयांचा ढोबळ नफा झाला आहे. पावडर व बटरमध्ये मोठे नुकसान होऊनदेखील १३० कोटी रुपये बँक कर्जाची परतफेड केली. दुग्ध पदार्थांच्या विक्री व्यवस्थेत बदल करून रिलायन्स, डी-मार्ट, शेतकरी संघ यांच्याशी करार करण्यात आल्याने वारणाची दूध व दुग्ध उत्पादने ग्राहकापर्यंत पोहोचविण्याचे यशस्वी काम संघाने केले आहे. भारतीय सैन्य दल, रेल्वे, बिहार राज्य, आदिवासी शाळांना तूप, दूध, पावडरची मागणी वाढली आहे. बोर्नव्हिटा या कंपनीची मागणी वाढल्याने माल्टेड फूडची क्षमता वाढवण्यासाठी ३० कोटी रुपयांचा नवा प्रकल्प डिसेंबरअखेर सुरू करण्यात येणार असून, परिसरातील १५० लोकांना रोजगार मिळणार असल्याचे कोरे यांनी सांगितले.
संघाचे कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी नोटीस वाचन व श्रद्धांजलीचा ठराव मांडला. सभेपुढील सर्व विषय सभासदांनी मंजूर केलेत. व्यासपीठावर संघाचे उपाध्यक्ष एच. आर. जाधव, संघाचे सर्व संचालक, कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील, वारणा बॅंकेचे उपाध्यक्ष उत्तम पाटील, बॅंक ऑफ इंडियाचे शाखाधिकारी अमितकुमार उपस्थित होते. शीतल बसरे व राजेंद्र पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर उपाध्यक्ष एच. आर. जाधव यांनी आभार मानले.
एका बटणावर मिळणार माहिती -
वारणा दूध संघाने सुरू केलेल्या ॲपच्या माध्यमातून दूध उत्पादकांना सर्व पातळीवरची माहिती एका बटणावर मिळणार असून, सर्व यंत्रणा तयार आहे. देशातील दुग्ध व्यवसायात वारणेने पहिले ॲप सभासद दूध उत्पादकांसाठी सुरू केले आहे. दूध उत्पादक शेतकरी व संघ यांच्यातील समन्वय साधला जाणार आहे. उत्पादकांच्या तक्रारीचे निरसन, पशुवैद्यकीय सेवेबरोबर इतर सुविधा व माहिती मिळणार आहे.
राज्य सरकार नाय म्हणतंय आणि भारत सरकार व्हयं म्हणतंय..
वारणा दूध संघामार्फत ॲग्रिकल्चरल डेअरी डिप्लोमा व पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचे काम सुरू होते; परंतु राज्य सरकारने त्यास नकार दिला; पण भारत सरकारने त्यास प्रतिसाद दिला. यावर राज्य सरकार नाय म्हणतंय आणि भारत सरकार व्हय म्हणतंय अशी टिप्पणी कोरे यांनी करून लवकरच कॉलेजचे हे स्वप्न पूर्ण होईल सांगितले.
फोटो ओळी: तात्यासाहेब कोरेनगर येथील वारणा सहकारी दूध संघाच्या ५३व्या वार्षिक सभेत संघाचे अध्यक्ष व आमदार डॉ. विनय कोरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संघाचे उपाध्यक्ष एच.आर. जाधव, कार्यकारी संचालक मोहन येडूरकर, कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील, बँकेचे उपाध्यक्ष उत्तम पाटील आदी.
----------------------------