वडगावला पालिकेचे मुख्याधिकारी पद रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:23 IST2021-04-06T04:23:34+5:302021-04-06T04:23:34+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पेठवडगाव : येथील वडगावमधील पालिका मुख्याधिकाऱ्यांचे पद रिक्त असल्यामुळे प्रशासकीय कामकाजात अडथळा निर्माण होत आहे. ...

Wadgaon Municipal Corporation Chief Officer post vacant | वडगावला पालिकेचे मुख्याधिकारी पद रिक्त

वडगावला पालिकेचे मुख्याधिकारी पद रिक्त

लोकमत न्यूज नेटवर्क

पेठवडगाव : येथील वडगावमधील पालिका मुख्याधिकाऱ्यांचे पद रिक्त असल्यामुळे प्रशासकीय कामकाजात अडथळा निर्माण होत आहे. तीन महिन्यांपासून नवीन मुख्याधिकारी रुजू झाले नसल्याने जयसिंगपूर मुख्याधिकाऱ्यांकडे वडगावचा अतिरिक्त कारभार सोपवला आहे. त्यामुळे धोरणात्मक निर्णय घेताना अडचणी येत आहेत.

मुख्याधिकारी सुषमा कोल्हे-शिंदे यांची पदोन्नतीवर पिंपरी-चिंचवडच्या सहाय्यक आयुक्त म्हणून बदली झाली. पालिका निवडणुकीपूर्वी शहरातील विकासकामे मार्गी लागावी, यासाठी पालिकेत मुख्याधिकाऱ्यांची नेमणूक होण्यासाठी सत्तारूढ गट पाठपुरावा करत आहे. मात्र, त्यांना यश आलेले नाही. सध्या पेठवडगावचा अतिरिक्त पदभार हा सुमारे तीस किलोमीटर अंतरावर असणाऱ्या जयसिंगपूर येथील मुख्याधिकारी टीना गवळी यांच्याकडे आहे. त्या कार्यक्षम असल्या, तरी त्यांना काही बंधने आहेत. त्यामुळे वडगावचा विकास खुंटला आहे तसेच येत्या वर्षभरात आपल्या सोयीच्या व आगामी पालिका निवडणुकीसाठी विकासकामे करताना सोयीचे व्हावे, यासाठी पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याने प्रशासकीय कामकाजाकडे दुर्लक्ष होत आहे. शहरात अतिक्रमणात वाढ तसेच कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असून, व्यापारी, नागरिकांमध्ये बेशिस्तपणा वाढला आहे. या पार्श्वभूमीवर खमक्या मुख्याधिकाऱ्यांची गरज आहे.

अलिकडील काळात अतुल पाटील, सुषमा कोल्हे-शिंदे यांनी उत्कृष्ट काम करून आपल्या कामाची छाप पाडली आहे. शिंदे-कोल्हे यांनी शहराच्या सर्वांगिण विकासासाठी प्रशासकीय यंत्रणा गतिमान केली होती. कोरोना काळात प्रशासकीय यंत्रणा सजग करून कोरोना आटोक्यात आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. कोरोना जनजागृती, रुग्णांसाठी कोविड सेंटर उभारणी, अलगीकरण आणि विलगीकरण कक्ष उभारणी, आदी उपाययोजना केल्या होत्या. तर स्वच्छता अभियानामध्येही देशात क्रमांक पटकावण्यासाठी स्वतःसह प्रशासन, सामाजिक संस्था यांच्या मदतीने प्रयत्न केले होते.

यामुळे शहरवासीयांच्या अपेक्षा वाढल्या असताना, तीन महिने प्रभारी मुख्याधिकारी कार्यरत आहेत. त्यामुळे नागरिकांची कामे थांबली आहेत. कोणतेही काम असले की, आज प्रभारी मुख्याधिकारी नाहीत, उद्या या, असे सांगितले जाते. त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

Web Title: Wadgaon Municipal Corporation Chief Officer post vacant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.