Vision Agro director arrested in multi-crore fraud case | कोट्यवधी फसवणूक प्रकरणी व्हिजन ॲग्रोच्या संचालकास अटक

कोट्यवधी फसवणूक प्रकरणी व्हिजन ॲग्रोच्या संचालकास अटक

ठळक मुद्देकोट्यवधी फसवणूक प्रकरणी व्हिजन ॲग्रोच्या संचालकास अटकमुख्य संशयित खुडे दाम्पत्यासह इतर फरार संचालकांचा शोध सुरू

कोल्हापूर : गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी व्हिजन ॲग्रो कंपनीविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. त्यांतील एक संचालक सुशील पाटील याला बुधवारी रात्री अटक करण्यात आर्थिक गुन्हे शाखेस यश आले. गुरुवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला चार दिवसांची कोठडी सुनावली.

व्हीनस कॉर्नर, शाहूपुरी येथील व्हिजन ॲग्रो कंपनीच्या माध्यमातून प्रवर्तक विकास खुडे, विद्या खुडे यांनी गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली व कार्यालय बंद करून सहाजण फरार झाले. तपासादरम्यान आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर यांच्या पथकाने गुन्ह्यातील मुख्य संशयित आरोपी विकास खुडे यांच्या पोलें (ता. पन्हाळा) येथील घराची झडती घेऊन महत्त्वाची कागदपत्रे, किमती घड्याळ, पल्सर मोटारसायकल, आदी साहित्य जप्त केले.

यातील इतर संशयित आरोपींच्या घराची झडती सुरू केली. तपासादरम्यान बुधवारी (दि. २३) पोलिसानी यवलूज (ता. पन्हाळा) येथील कंपनीचा संचालक सुशील पाटील याच्या घराची झडती घेतली. यावेळी संशयित पाटील हा पोटमाळ्यावर अंधारात लपून बसला होता. त्याला ताब्यात घेऊन रीतसर अटक केली.

संशयित पाटील याच्याकडे खोलवर चौकशी केल्यानंतर महत्त्वाची कागदपत्रे, लॅपटॉप आणि महत्त्वाची माहिती मिळाली. गुरुवारी (दि. २४) दुपारी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. मुख्य संशयित खुडे दाम्पत्यासह इतर फरार संचालकांचा शोध या शाखेकडून सुरू आहे.
 

Web Title: Vision Agro director arrested in multi-crore fraud case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.