नर्सिंग कायद्याच्या नियमांचे उल्लंघन, कोल्हापूर जिल्ह्यातील ४२५ रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 18:26 IST2025-08-22T18:26:33+5:302025-08-22T18:26:47+5:30
तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

संग्रहित छाया
कोल्हापूर : महाराष्ट्र नर्सिंग कायद्यातील नियमांचे पालन केले नसल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील ४२५ रुग्णालयांना आरोग्य विभागाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. चौकशीनंतर पुढील ३० दिवसांत त्रुटींची पूर्तता न केल्यास संबंधित रुग्णालयाचे परवाने रद्द करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी महाराष्ट्र नर्सिंग कायद्यानुसार नोंदणी झालेल्या रुग्णालयांची तपासणी करण्याचा आदेश दिला होता, त्यानुसार राज्यातील सुमारे २६ हजार ३५४ रुग्णालयांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत ५ हजार १३४ रुग्णालयांनी महाराष्ट्र नर्सिंग कायद्यातील दिलेल्या सूचना व नियमांचे पालन केले नसल्याचे आढळून आले आहे.
या रुग्णालयांनी दर्शनी भागात दरपत्रक, सर्व हेल्पलाइन क्रमांक आदी माहिती लावणे बंधनकारक होते. मात्र यातील अनेक बाबींची पूर्तता केली नसल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या सर्व रुग्णालयांना त्रुटींची पूर्तता करण्यासाठी ३० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या या रुग्णालयांवर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
या आहेत तक्रारी
- मनमानी पद्धतीने उपचारांचा खर्च आकारणे
- उपचाराच्या खर्चाची रुग्णांना आणि नातेवाइकांना माहिती न देणे
- सुविधांचा अभाव, मान्यता नसणारे उपचार करणे, प्राथमिक सुविधांचा अभाव
- रुग्णालयात अपुरी सुरक्षा व्यवस्था