Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 10:26 IST2025-07-29T10:25:21+5:302025-07-29T10:26:13+5:30
Kolhapur Mahadevi Elephant : उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मिरवणुकीने निरोप, ठिकठिकाणी महिलांनी केले औक्षण

Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
जयसिंगपूर - गेली ३५ वर्षे जिव्हाळ्याचे नाते असणाऱ्या शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टारक संस्थान मठातील माधुरी ऊर्फ महादेवी हत्तीण अखेर सोमवारी रात्री गुजरातकडे रवाना झाली. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय कायम ठेवत सर्वोच्च न्यायालयाने मठाची याचिका फेटाळल्यामुळे हत्तीणीला नांदणी पंचक्रोशीतील सर्वधर्मीयांनी पाणावलेल्या डोळ्यांनी निरोप दिला. गावातील प्रमुख मार्गावरून ग्रामस्थांच्या उपस्थितीत हत्तीणीची वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली.
नांदणी येथील प. पू. स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठाच्या महादेवी हत्तीण प्रकरण चर्चेत आले होते. धार्मिक विधीसाठी हत्तीच्या वापराच्या हक्काचा संघर्ष असताना प्राण्यांच्या हक्कालाच प्राधान्य द्यावे लागेल असे निरीक्षक मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच नोंदवले होते. त्यानुसार हत्तीणीला दोन आठवड्यात पाठविण्याची परवानगी न्यायालयाने दिली होती. उच्च न्यायालयाच्या या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात मठ संस्थानने याचिका दाखल केली. या याचिकेच्या सुनावणीकडे सोमवारी सकाळपासूनच सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते. दुपारी न्यायालयाने मठाची याचिका फेटाळल्याचे वृत्त धडकताच नांदणीसह मठाच्या कार्यक्षेत्रातील गावामध्ये हत्तीणीप्रती हळहळ व्यक्त करण्यात येत होती.
तिला सन्मानाने निरोप द्यायचा आहे असा संदेश मिळताच निशीदीसह मठामध्ये सायंकाळी ५ नंतर गर्दी व्हायला सुरू झाली. हत्तीणीला हजारो लोकांच्या उपस्थितीत मठामध्ये आणले. यावेळी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी सुरू झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. महास्वामींनी शांततेचे आवाहन केले. त्यांना अश्रू अनावर झाल्यानंतर गोंधळ निवळला. यावेळी ग्रामस्थ, अबालवृद्ध यांच्यासह महिलांनी मठामध्ये गर्दी केली होती. हत्तीणीच्या पूजनावेळी मठामध्ये महिला अक्षरशः धाय मोकलून रडत होत्या. ग्रामस्थांच्या भावनेचा विचार करत प्रशासनाने हत्तीणीच्या मिरवणुकीची परवानगी दिली. गावातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक निशीदीजवळ आल्यानंतर रात्री उशिरा गुजरात येथील वनतारा हत्ती केंद्राच्या अॅनिमल अॅम्ब्युलन्समध्ये महादेवीला बसविण्यात आले. नांदणीकरांच्या अश्रूचा बांध यावेळी फुटला. मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.
महादेवीच्या डोळ्यातून अश्रू
चार वर्षाची असताना कर्नाटक येथून महादेवीला नांदणी येथे आणले होते. २०२० पासून न्यायालयीन लढाई सुरू होती. धार्मिक कार्यक्रमाबरोबरच नांदणी, जयसिंगपूर शहर परिसरात तिचा वावर होता. निशीदीपासून मठाकडे नेत असताना खुद्द महादेवीच्या डोळ्यातूनदेखील अश्रू ढळू लागल्याने पाहणाऱ्यांचे डोळे पाणावले. तर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आम्हाला मान्य आहे. महादेवीचे पुढील काळात चांगले संगोपन व्हावे अशी भावना ठेवूया. आम्ही महादेवीला कधीच विसरणार नाही असं नांदणी पट्टाचार्य महास्वामी स्वस्तिशी जिनसेन भट्टारक यांनी सांगितले आहे.
नांदणी येथे पोलिस वाहनांवर दगडफेक, लाठीमार
दरम्यान, महादेवी हत्तीणीची मिरवणूक सुरू असताना अचानकपणे पोलिस वाहनांवर दगडफेक करण्यात आली. यामुळे मोठा गोंधळ उडाला. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. ही घटना सोमवारी रात्री अकराच्या सुमारास घडली आहे. नांदणी गावातील प्रमुख मार्गावरून ही मिरवणूक भरत बँकेजवळ आल्यानंतर आम्ही हत्तिणीला नेऊ देणार नाही, अशी भूमिका व्यक्त करण्यात आली. यावेळी अचानकपणे पोलिस वाहनावर दगडफेक सुरू झाली. यात दोन वाहनांचे नुकसान झाले. सुमारे दहा मिनिटे दगडफेकीचा प्रकार सुरू होता.