नागदेववाडी : कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीविरोधात करवीर तालुक्यातील बालिंगे व पाडळी खुर्दच्या ग्रामस्थांनी आज, शुक्रवारी रस्त्यावर येत जोरदार विरोध केला. कोल्हापूर-गगनबावडा मार्ग रोखल्याने तब्बल तासभर या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. पोलिसांनी ग्रामस्थांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले. आज सकाळी दहा वाजता बालिंगे व पाडळी खुर्द येथील ग्रामस्थ बालिंगे ग्रामपंचायतीसमोर एकत्रित आले. आमदार चंद्रदीप नरके, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष मधुकर जांभळे यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी महापालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आमदार नरके म्हणाले, महापालिका प्रशासनाने ग्रामीण जनतेला अंधारात ठेवून हद्दवाढीचा प्रस्ताव तयार केला आहे, हे सहन करणार नाही. येथील जनतेवर त्यांचे प्रेम नाही, मोकळे भूखंड हडप करण्यासाठीच त्यांना हद्दवाढ पाहिजे आहे. या विरोधात न्यायालयात जाणार आहे. मधुकर जांभळे म्हणाले, सर्व सोयी-सुविधा आम्हाला मिळत असताना महापालिकेची दादागिरी का? केवळ महसूल गोळा करण्यासाठी ग्रामस्थांचे जीवन व व्यवसाय उद्ध्वस्त करणार असाल तर याद राखा. याची किंमत मोजावी लागेल.बालिंगेच्या सरपंच गीता कांबळे, उपसरपंच दशरथ वाडकर, रघुनाथ बुडके, भाजपचे सरचिटणीस अमर जत्राटे, ‘मनसे’चे जिल्हा उपाध्यक्ष अमित पाटील, काँग्रेसचे अनिल पोवार, तुकाराम जांभळे, एम. एस. भवड, श्रीकांत भवड, धनंजय ढेंगे, अतुल बोंद्रे, मोहन घोडके, बाजीराव माने, पाडळीच्या सरपंच शीला कांबळे, संभाजी पाटील, मोहन पाटील, जी. डी. पाटील, आनंदराव पाटील, शशांक जांभळे, संभाजी माळी, बाळासो जाधव, आर. के. वाडकर, आदी हजारो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. गांधीनगरवासीयांचा मोर्चाहद्दवाढीस विरोध करत गांधीनगर येथील रहिवाशांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. या ठिकाणी तीव्र निदर्शने करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.दुपारी साडेबाराच्या सुमारास सासने मैदान येथून मोर्चाला सुरुवात झाली. शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राजाराम माने यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले. आंदोलनात सरपंच लक्ष्मीबाई उदासी, सिंधी सेंट्रल पंचायतचे अध्यक्ष भजनलाल डेंबडा, रमेश तनवाणी, ताराचंद वाधवाणी, विजय जसवाणी, श्रीचंद पंजवाणी, नानक सुंदराणी, राजू माने, अमित जेवराणी, आदी सहभागी झाले होते. कळंब्यात ग्रामसभाकळंबा : शहरातील नागरिकांना किमान मूलभूत सुविधा पालिका देऊ शकत नसताना हद्दवाढीचा घाट का? हद्दवाढीचा प्रयत्न प्रसंगी कायद्याच्या लढाईने हाणून पाडू, असे प्रतिपादन सरपंच विश्वास गुरव यांनी शाहू सभागृहात हद्दवाढीविरोधात आयोजित ग्रामसभेत बोलताना व्यक्त केले. अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती दिलीप टिपुगडे होते. यावेळी उपसरपंच उदय जाधव, दत्तात्रय हळदे, दीपक तिवले, पूजा पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, माजी उपसरपंच पूजा पाटील यांच्या नेतृत्वाखाली महिला व ग्रामस्थांनी निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार यांना हद्दवाढीतून कळंबा गाव वगळण्याचे निवेदन दिले. शिष्टमंडळात भगवान पाटील, योगेश तिवले, आनंदी पाटील, वैशाली पाटील, सुवर्णा संकपाळ, सुवर्णा लोहार, माधुरी संकपाळ, मुबिना सय्यद, दीपाली मिरजे, आदी उपस्थित होते.नागावमध्ये विरोधासाठी बैठकशिरोली : महानगरपालिकेने सध्या शहर व उपनगरांचा किती विकास केला याचे अगोदर आत्मचिंतन करावे, मग हद्दवाढीसाठी प्रस्ताव ठेवावा, अशी टीका शिरीष फोंडे यांनी केली. नागाव (ता. हातकणंगले) येथील खणाईदेवी मंदिरात हद्दवाढीला विरोधासाठी बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महेश चव्हाण, सरपंच उत्तम सावंत, उपसरपंच राजेंद्र यादव, रणजित केळूसकर, भाऊसाहेब कोळी, डॉ. गुंडा सावंत, गणपती माळी, गणपती पोवार, सुरेश यादव, हरी पुजारी, उमेश गायकवाड, आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, हद्दवाढीविरोधात उद्या, शनिवारी नागाव व शिरोली दोन्ही गावांतील सर्व शाळांच्यावतीने सकाळी आठ वाजता जनजागृतीसाठी प्रभातफेरी व पथनाट्ये सादर केली जाणार आहेत.शिरोली : महापालिकेत आम्हाला जायचे नाही. आम्हाला स्वतंत्र टाऊनशीपच हवी. महापालिकेतून शिरोली व गोकुळ शिरगाव या दोन्ही एमआयडीसींना वगळावे, असे निवेदन ‘स्मॅक’च्यावतीने कोल्हापुरात खासदार धनंजय महाडिक व गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना दिले.यावेळी झालेल्या बैठकीत ‘स्मॅक’चे अध्यक्ष सुरेंद्र जैन म्हणाले, शिरोली व गोकुळ शिरगाव या दोन्ही औद्योगिक वसाहतींसाठी स्वतंत्र टाऊनशीपचा प्रस्ताव शासनदरबारी प्रलंबित आहे. दोन्हीही लोकप्रतिनिधींनी याबाबत पाठपुरावा करून टाऊनशीप मंजूर करून द्यावी.यावेळी धनंजय महाडिक यांनी हद्दवाढीबाबत महापालिका, उद्योजक व नगरविकास खात्याची बैठक बोलावून हा प्रश्न सोडवू, असे सांगितले. गृहराज्यमंत्री सतेज पाटील म्हणाले, दोन्ही एमआयडीसींच्या टाऊनशीपबाबतचे प्रस्ताव मंत्रालयात आहेत. निश्चित पाठपुरावा करून टाऊनशीप मंजूर करण्यासाठी प्रयत्न करू. या शिष्टमंडळात ‘गोशिमा’चे अध्यक्ष उदय दुधाणे, ‘स्मॅक’चे उपाध्यक्ष राजू पाटील, सचिन पाटील यांच्यासह उद्योजक उपस्थित होते.कणेरी : गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहत व गावांना हद्दवाढीतून वगळण्यासाठी जनहित याचिका दाखल करण्याचा ठराव गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या (गोशिमा) बैठकीत घेण्यात आला. संघटनेच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत हद्दवाढीत समाविष्ट होणाऱ्या गावांतील पदाधिकाऱ्यांसह नागरिकांनी हजेरी लावून विरोध दर्शविला. अध्यक्षस्थानी ‘गोशिमा’चे अध्यक्ष उदय दुधाणे होते.यावेळी दुधाणे म्हणाले, गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीचा महापालिकेत समावेश केला, तर येथील उद्योजकांना कर्नाटकात जाण्याशिवाय पर्याय नाही. यावेळी उद्योजकांसह हद्दवाढ प्रस्तावित गावांतील पदाधिकारी व नागरिकांनी मंगळवारी (दि. १ जुलै) गोकुळ शिरगाव बस थांबा येथे जनावरांसह महामार्ग रास्ता रोको करण्याची घोषणा केली. हद्दवाढविरोधी कृती समितीचे निमंत्रक राजू माने यांनी हद्दवाढविरोधात १४ जुलैला महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात येणार असल्याचे सांगितले.यावेळी गोकुळ शिरगावचे एम. एस. पाटील, संभाजी पाटील, कणेरीवाडीचे सरपंच पांडुरंग खोत, टी. के. पाटील, नाथाजी पोवार, आदींसह उद्योजक चंद्रकांत जाधव, देवेंद्र दिवाण, आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी गोकुळ शिरगावचे उपसरपंच चंद्रकांत डावरे, सर्जेराव मिठारी, प्रकाश मिठारी, उद्योजक आर. पी. पाटील, जे. आर. मोटवानी, मोहन पंडितराव, आदी उपस्थित होते.\
हद्दवाढविरोधात गावे रस्त्यावर
By admin | Updated: June 28, 2014 00:48 IST