Village - Subway work is underway in Bharan | खेड-भरणेत भुयारी मार्गाचे काम सुरू
खेड-भरणेत भुयारी मार्गाचे काम सुरू

ठळक मुद्देखेड - भरणेत भुयारी मार्गाचे काम सुरूदोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती

खेड : मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणादरम्यान भरणेनाका येथील जंक्शनवर निर्माण होणारी वाहतुकीची संभाव्य अडचण दूर करण्याच्या दृष्टीने या ठिकाणी भुयारी मार्ग तयार करण्यात येत आहे. महामार्ग चौपदरीकरणाचा ठेका घेतलेल्या कल्याण इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने भुयारी मार्गाचे काम सुरु केले आहे. तीन पोकलेन मशीन्स, दोन जेसीबी आणि तीन वाहने दिवस-रात्र काम करताना दिसत आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा ते आंबवली मार्गावरील साई-रिसॉर्ट हॉटेल या दरम्यान भुयारी मार्ग तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे आंबवली आणि दापोलीकडे जाणाऱ्या वाहनांचा मार्ग मोकळा झाला आहे. चौपदरीकरणाच्या कामात सुरूवातीपासूनच अनेक अडचणी निर्माण होत आहेत. यामध्ये महामार्गासाठी संपादीत करण्यात आलेल्या जागेमध्ये असलेली बांधकामे ही मुख्य अडचण होती.

महामार्ग रुंदीकरणाच्या आड येणारी बांधकामे संबधित मालकाने स्वत:हून रिकामी करून द्यावीत, अशी सूचना महामार्ग विभागाकडून करण्यात आली होती. काही व्यावसायिकांनी या सूचनेचे पालन केले. मात्र, काहींनी या सूचना धुडकावल्याने ही बांधकामे पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त करावी लागली. आता तर चौपदरीकरणाला अडथळा ठरणाऱ्या बांधकामांशी संबंधित असणाऱ्यांवर दखलपात्र गुन्हे दाखल करण्याची तंबीच दिली आहे. तसे फलकही लावण्यात आले आहेत. भरणे नाका परिसरात महामार्ग चौपदरीकरणासाठी सपाटीकरणाचे काम सुरु आहे.

कर्मचारी नियुक्त

चौपदरीकरणाचे सपाटीकरण आणि भुयारी मार्ग यामुळे या जंक्शनवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. त्यामुळे चालकांची फसगत होत असल्याने चिपळूणला जाणारा चालक दापोलीकडे, तर दापोलीकडे जाणारा चालक आपले वाहन चिपळूणकडे घेऊन जात आहे. चालकांची होणारी फसगत लक्षात आल्यानंतर योग्य पर्यायी मार्गाबाबत चालकांना माहिती देण्यासाठी दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे चालकांची होणारी फसगत थांबली आहे.
 

Web Title: Village - Subway work is underway in Bharan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.