‘गाव माझा...मी गावाचा’ ही भावना हवी

By Admin | Updated: January 11, 2016 00:51 IST2016-01-11T00:32:05+5:302016-01-11T00:51:10+5:30

भारत पाटील यांची अपेक्षा : गावे दत्तक घेऊन लोक होतात पंगू

'Village me ... I want a feeling of village' | ‘गाव माझा...मी गावाचा’ ही भावना हवी

‘गाव माझा...मी गावाचा’ ही भावना हवी

कोल्हापूर : ‘हा गाव माझा आहे व मी या गावाचा आहे’ ही भावना ग्रामस्थांत निर्माण करून गावाचा विकास हा त्यांच्या मनात रुजविला पाहिजे तरच विकासाची प्रक्रिया वेग घेऊ शकते. गावांचा सहभाग नसेल तर नुसती गावे दत्तक घेऊन विकास अशक्य आहे. त्यामुळे लोकांच्या मनात सगळे आयते मिळावे ही भावना वाढीस लागते, असे मत ग्रामविकास चळवळीतील कार्यकर्ते व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष भारत पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

१गावांच्या विकासासाठी नेमके काय करायला हवे यासंबंधी भारत पाटील यांनी सुचविलेली सूत्रे अशी -
गाव दत्तक घेतल्यावर ते गाव शासनाच्या प्राधान्य यादीत येते. निधी उपलब्ध होतो; परंतु कारभारी विचाराने पंगू होतात. सगळे आयते मिळाले की लोकांना त्याची किंमत वाटत नाही. त्यामुळे दत्तक गाव घेतले तरी लोकसहभाग वाढविणे अत्यंत आवश्यक आहे. गावाचा विकास कसा व्हायला हवा हे त्यांनाच ठरवू द्या. कारण सरकारी यंत्रणेपेक्षा स्थानिक लोकांना गावाची माहिती जास्त असते.’

२ महाराष्ट्रातील कोणताही जिल्हा व कोणतेही गाव घेतले तरी अपवाद वगळता त्यांच्यासमोर आज गाव विकासाचा निश्चित असा आराखडाच नाही. त्यावर ग्रामविकास विभागाने कधी काम केलेले नाही. पुढची पन्नास वर्षे डोळ््यांसमोर ठेवून पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि मानव विकास अशा सर्वच पातळ्यांवर काय आहे व काय करायला हवे याचा सुनियोजित आराखडा तयार करण्याची गरज आहे. त्यासाठी नव्या तंत्रज्ञानाची मदत घेतली पाहिजे; परंतु नेमके तेच होताना दिसत नाही.

३ शासनाकडून आलेला निधी खर्च होतो आणि गावांचे प्रश्नही सुटत नाहीत, असे वास्तव सध्या दिसते. अनेक गावांतील राष्ट्रीय
पेयजल योजनेतील गैरव्यवहाराच्या तक्रारी हे त्याचेच लक्षण आहे. ग्रामपंचायतीला लोक विकास करण्यासाठी नव्हे तर कंत्राटे घेण्यासाठी निवडून जात आहेत. ही कंत्राटी मानसिकता विकासाच्या चळवळीत आडवी येत आहे.


४ ‘हे गाव माझे आहे व पुढच्या पिढ्याही आम्ही गावातच राहणार आहोत. तेव्हा नव्या शतकाला सामोरे जाताना माझ्यासमोर गाव विकासासाठी स्पष्ट कल्पना हवी व ती ग्रामस्थांच्या मनात रुजविली गेली पाहिजे. आमदार-खासदार यांनी गावे दत्तक घेतली की, त्याची योजना होते. एकदा योजना झाली की, त्याचे काय होते हे वेगळे सांगायची गरज नाही. त्यापेक्षा गाव दत्तक घेण्याची चळवळ झाली पाहिजे. ज्यांनी हे गाव दत्तक घेतले आहे, त्यांनाही त्या गावाबद्दल आस्था वाटली पाहिजे. लोकांच्या प्रश्नांशी ते समरस झाले पाहिजेत. नाही तर वर्षातून एकदा कलेक्टरांसह सर्वांना बरोबर घेऊन मिटिंग घेतली की झाला गावाचा विकास, अशाने काहीच हाती लागणार नाही. सध्या या गावांचा यापेक्षा वेगळा अनुभव नाही.


५ रस्ते, गटर्स बांधणे म्हणजेच झाला विकास यातच गेली ७० वर्षे आपले ग्रामविकास मंत्रालय अडकून पडले आहे. त्यापलीकडे गावातील शाळांचा शैक्षणिक दर्जा, शेतीचा विकास, कौटुंबिक, सामाजिक विकास, चांगले आरोग्य याचा विचार विकास म्हणून आपण अजूनही करीत नाही. जिल्ह्यांतील अनेक गावांतील हजारो बाया-बापड्या अ‍ॅनेमिक आहेत. कारण त्यांना सकस आहार मिळत नाही. नुसते दवाखाने उभारले म्हणजे झाले असे नव्हे. एकूण मानवी जीवनाची प्रत सुधारावी असा या योजनांचा गाभा हवा. निधी देऊन तुम्ही तीन वर्षांत गाव बदलून दाखवा; परंतु तेवढ्याने तुमची जबाबदारी संपत नाही. ते गाव पुढची दहा वर्षे तसेच राहिले पाहिजे. गाव बदलणे सोपे आहे; परंतु त्यात सातत्य टिकविणे हे जास्त आव्हानात्मक आहे.
६पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री सांगतात म्हणून लोकप्रतिनिधी गाव दत्तक घेतात. त्यापेक्षा आपण ज्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतो, त्यातील एखादे तरी गाव स्वत:हून मॉडेल करावे, असे लोकप्रतिनिधींनाही वाटत नाही. हिवरे बाजार, पाटोदा, आंबवडे ही गावे त्या गावांनी ठरविले म्हणून राज्यात भारी ठरली. त्यांना कुणी बाहेरून जाऊन तुम्ही चांगले व्हा, असे सांगितले नाही हे सर्वांनी लक्षात घ्या.

Web Title: 'Village me ... I want a feeling of village'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.