Video: कमळाचे देठ म्हणून घातक जलपर्णीची होतेय विक्री; सतर्कतेमुळे फसवणूक टळली
By संतोष भिसे | Updated: January 13, 2023 14:25 IST2023-01-13T12:33:32+5:302023-01-13T14:25:43+5:30
खंडेराजुरी (ता. मिरज) येथे जलपर्णीचे खुंट विकून ग्रामस्थांना फसविणाऱ्याला तरुणांनी हाकलून लावले.

Video: कमळाचे देठ म्हणून घातक जलपर्णीची होतेय विक्री; सतर्कतेमुळे फसवणूक टळली
सांगली/मालगाव : ट्युलीप किंवा कमळाचे देठ म्हणून चक्क जलपर्णी विक्रीचा प्रकार खंडेराजुरी (ता. मिरज) येथे घडला. फसवणूक लक्षात येताच तरुणांनी विक्रेत्याला हाकलून लावले. सध्या सोशल मीडियावर या घटनेचे काही व्हिडिओही व्हायरल झाले आहेत.
बीड येथील काही तरुण गावात शोभेची रोपे विकण्यासाठी आले होते. त्यांच्याकडे वेगवेगळ्या रंगांनी रंगविलेले देठ होते. दहा रुपयांना एक यानुसार विक्री करीत होते. काही ठिकाणी ट्युलीप म्हणून, तर काही ठिकाणी कमळ म्हणून सांगितले जात होते. त्याच्या वाढीनंतर सुंदर फुले येतात हे दाखविण्यासाठी सोबत छायाचित्रेही दाखविली जात होती. गावातील तरुण अशोक चौगुले यांच्यासह काहींनी हा प्रकार फसवणुकीचा असल्याचे ओळखले. विक्रेत्याला जाब विचारला. बनवेगिरी ग्रामस्थांच्या लक्षात येताच विक्रेत्याने माघार घेतली. ही जलपर्णी असल्याचे कबूल केले. लोकांचे पैसेही परत केले. पाटीतील देठ फेकून दिले व निघून गेला.
ट्युलीप किंवा विविधरंगी कमळ म्हणून पन्नास रुपयांना एक किंवा शंभरला तीनप्रमाणे जलपर्णी सर्रास विकली जाते. सुंदर, रंगीबेरंगी आणि कोवळे कंद पाहून बागप्रेमी हरखून जातात. कुंडीत लावल्यावर निळी-जांभळी फुलेही लागतात. त्यावेळी तो ट्युलीप किंवा कमळ नसून, जलपर्णी असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे उपटून गटारीत फेकली जातात. पण, ही चिवट जलपर्णी नाल्यांत पसरते. नदीपात्रावरही फैलावते. अशा फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन अभ्यासकांनी केले आहे.
औरंगाबाद - कमळाचे देठ म्हणून जलपर्णीची होतेय विक्री, फसवणुकीपासून सावध राहा pic.twitter.com/q6rkSajIJq
— Lokmat (@lokmat) January 13, 2023
जलपर्णीचे देठ रंगवून सर्रास विक्री केली जाते. परप्रांतीय लोक हा उद्योग करतात. पण, यामुळे नदी-नाल्यांचे प्रदूषण वाढते. फेकून दिलेली जलपर्णी पाण्याचे प्रवाह अडविते. त्यामुळे नागरिकांनी असे देठ घेऊ नयेत.
- अमोल जाधव, नेचर कॉन्झर्व्हेशन सोसायटी