कोल्हापूर : जिल्ह्यातील कोल्हापूर उत्तर व चंदगड विधानसभा मतदारसंघांतील काही ईव्हीएम मशीनमधील डेटा इरेज करून त्यावर २१ पासून पडताळणी करण्यात येणार आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी ईव्हीएम मशीनमधील डेटा काढू नका, असे निर्देश दिल्याने या दोन मतदारसंघांची ईव्हीएमची पडताळणी कशी केली जाणार, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. कारण निवडणूक आयोगाकडून जिल्हा निवडणूक विभागाला अद्याप याबाबत कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत.विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काही उत्तर व चंदगड मतदारसंघातील पराभूत उमेदवारांनी ईव्हीएम मशीनच्या तपासणीची मागणी केली होती. त्यानुसार २१ तारखेपासून या मशीनची राजाराम तलाव येथे तपासणी व पडताळणी केली जाणार आहे. ही फेरमतमाेजणी नाही, तर उमेदवारांनी सांगितलेल्या केंद्रांवरील ईव्हीएम मशीनमधील आधीचा डेटा काढून टाकून त्यात डमी मतपत्रिका लावल्या जातात व त्यावर १४०० मतदान करून त्यांची पडताळणी केली जाणार आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने मशीनमधील डेटा काढून टाकण्याला मनाई केली आहे. त्यामुळे या मतदान केंद्रांवरील ईव्हीएम मशीनची पडताळणी आता कशी करणार याबद्दल संभ्रम आहे. याबाबत जिल्हा निवडणूक विभागाकडे अजून निवडणूक आयोगाचे स्पष्ट निर्देश आलेले नाहीत.
कोल्हापूर उत्तर, चंदगडच्या ईव्हीएममशीनची पडताळणी संभ्रमात
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 13:27 IST