‘साथी पोर्टल’ला विरोध; राज्यातील बी-बियाणे विक्रेत्यांची उद्या दुकाने बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 17:26 IST2025-10-27T17:26:06+5:302025-10-27T17:26:54+5:30
मार्जीन कमी, त्यात हा भुर्दंड

‘साथी पोर्टल’ला विरोध; राज्यातील बी-बियाणे विक्रेत्यांची उद्या दुकाने बंद
कोल्हापूर : केंद्र सरकारने रासायनिक खतांसाठी ‘पॉश मशीन’ची सक्ती केली त्याच धर्तीवर बी-बियाण्यांसाठी ‘साथी पोर्टल’ वरच विक्री करण्यास सांगितले आहे. त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रातून सुरू केल्याने बी-बियाणे विक्रेत्यांमध्ये असंतोष पसरला आहे. या निर्णयाला विरोध करण्यासाठी उद्या, मंगळवारी राज्यातील विक्रेते दुकाने बंद ठेवणार आहेत.
साथी पोर्टल वापरण्यामागे सरकारचा मूळ उद्देश शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार बियाणे मिळावे, असा आहे. मात्र, दर्जेदार बियाणे निर्मिती करण्याची जबाबदारी ही बियाणे कंपन्यांची आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने ‘साथी पोर्टल’चा वापर बियाणे कंपन्यांच्या पातळीवर करणे खरी गरज आहे. त्यामुळे विक्रेत्यांना ‘साथी पोर्टल’ सक्ती रद्द करा, या मागणीसाठी राज्यातील विक्रेते उद्या, दुकान बंद ठेवणार असल्याची माहिती महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टीसाईडस डिलर्स असोसिएशनने पत्रकातून दिली.
मार्जीन कमी, त्यात हा भुर्दंड
बियाणे विक्रीमध्ये किरकोळ विक्रेत्यांना खूप कमी मार्जीन असते. साथी पोर्टल वर विक्री करण्यासाठी संगणक खरेदी करून तो हाताळणारा एक कर्मचारी ठेवावा लागणार आहे. संगणकासह कर्मचाऱ्यांचा महिन्याचा पगार द्यायचा कोठून? असा प्रश्न विक्रेत्यांसमोर आहे.
खतासाठी पॉश मशीन वापरणे एकवेळ समजू शकतो. मात्र, बियाण्यांच्या शंभरहून अधिक व्हरायटी आहेत. त्यासाठी साथी पोर्टलची सक्ती करणे चुकीचे आहे. देशात फक्त महाराष्ट्रातच सक्ती का करतात? याला विरोध करण्यासाठी राज्यातील सर्व विक्रेत्यांनी उद्या, मंगळवारी दुकान बंद ठेवावीत. - विनोद तराळ-पाटील (अध्यक्ष, महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टीसाईडस डिलर्स असोसिएशन)