गंजीमाळ परिसरात वाहनांची तोडफोड, घरावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 12:48 IST2021-04-13T04:24:33+5:302021-04-13T12:48:37+5:30
Crimenews Kolhpaur : टिंबर मार्केटमधील गंजीमाळ परिसरात सुमारे २० ते २५ युवकांच्या जमावाने हातात नंग्या तलवारी घेऊन धुडगूस घातला. परिसरातील सुमारे १५ हून अधिक वाहनांची तोडफोड केली. एका घरावरही हल्ला करून साहि्त्याची मोडतोड केली. हल्ल्यात तीन महिलांसह एकूण सहाजण जखमी झाले.

गंजीमाळ परिसरात वाहनांची तोडफोड, घरावर हल्ला
कोल्हापूर : टिंबर मार्केटमधील गंजीमाळ परिसरात सुमारे २० ते २५ युवकांच्या जमावाने हातात नंग्या तलवारी घेऊन धुडगूस घातला. परिसरातील सुमारे १५ हून अधिक वाहनांची तोडफोड केली. एका घरावरही हल्ला करून साहि्त्याची मोडतोड केली. हल्ल्यात तीन महिलांसह एकूण सहाजण जखमी झाले.
ही घटना सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. अवघ्या १५ मिनिटात तोडफोड करून हल्लेखोर पसार झाले. दोन दिवसांपूर्वी एका पक्षाच्या कार्यालयात घुसून मोडतोड केल्या प्रकरणाचे हे पडसाद उमटले.
शनिवारी गंजीमाळ येथे एका राजकीय पक्षाच्या शाखा कार्यालयाची मोडतोड केली होती. त्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांत ओंकार जाधव व बंडू प्रल्हाद लोंढे यांनी परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत. यामध्ये ओंकार जाधवसह चौघेजण अटकेत आहेत.
सोमवारी रात्री आठच्या सुमारास बंडू लोंढेसह २० ते २५ युवक हातात तलवारी, काठ्या, दगड घेऊन धावतच गंजीमाळ परिसरात आले. त्यांनी ओंकार जाधव याच्या घरावर हल्ला केला. दुमजली घरात घुसून प्रापंचिक साहित्याची तोडफोड केली, तसेच घरातील लोकांना बेदम मारहाण केली. हल्लेखोरांनी रस्त्याकडेचे तीन टेम्पो उलटून त्याची तोडफोड केली. त्याशिवाय १२ दुचाकींचीही मोडतोड केली. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात गोंधळ उडाला. काही क्षणातच हल्लेखोर धावत टिंबर मार्केट कमानीनजीक जाऊन तेथे उभ्या केलेल्या सुमारे १२ ते १५ दुचाकींवरून पसार झाले.
पोलिसांनी केला हल्लेखोरांचा पाठलाग
मोबाईल चोरट्याच्या शोधासाठी जुना राजवाडा पोलिसांची पथके जुना वाशीनाकाकडे निघाली होती. त्यांना हल्ल्याची घटना वायरलेसवरून समजल्यावर त्यांनी गंजीमाळच्या दिशेने मोर्चा वळवला. त्यावेळी हल्लेखोर कमानीतून दुचाकीवरून मोठ्या संख्येने बाहेर पडताना दिसले. त्यांनी त्यांचा पाठलाग केला. हल्लेखोरांच्या काही दुचाकी कळंबाच्या दिशेने गेल्या, तर काही हल्लेखोर रिंगरोडवरून हॉकी स्टेडियमकडे गेले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला, पण ते सापडले नाहीत.
हल्ल्यातील जखमी...
सिध्दी गणेश जाधव (वय २०), सुप्रिया सतीश जाधव (१५), अनुसया पांडुरंग जाधव (८०), विनोद पांडुरंग जाधव (४०), गणेश संजय जाधव (२२), सचिन पांडुरंग जाधव (४३, सर्व रा. गंजीमाळ, टिंबर मार्केट) अशी जखमींची नावे आहेत.