वीरशैव बँक पंधरा वर्षांनंतर पुन्हा बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:22 IST2021-01-22T04:22:02+5:302021-01-22T04:22:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : येथील वीरशैव को ऑप. बँक पंधरा वर्षांनंतर पुन्हा एकदा बिनविरोध करण्यात सत्तारूढ गटाला यश ...

Veershaiva Bank unopposed again after fifteen years | वीरशैव बँक पंधरा वर्षांनंतर पुन्हा बिनविरोध

वीरशैव बँक पंधरा वर्षांनंतर पुन्हा बिनविरोध

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : येथील वीरशैव को ऑप. बँक पंधरा वर्षांनंतर पुन्हा एकदा बिनविरोध करण्यात सत्तारूढ गटाला यश आले. गुरुवारी ज्येष्ठ संचालिका रत्नमाला घाळी, अरविंद माने, सुनील पाटील या तीन मातब्बरांनी माघार घेतल्यानंतर बँकेची निवडणूक बिनविरोध झाली परंतु त्याची औपचारिक घोषणा सोमवारी (दि.२५) बँकेतील प्रधान कार्यालयात होणाऱ्या सर्वसाधारण सभेत होणार आहे. नव्या संचालक मंडळात तीन नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली.

कर्नाटक व महाराष्ट्र असे कार्यक्षेत्र असणाऱ्या वीरशैव बँकेची २४ डिसेंबरला निवडणूक लागली होती. पूर्वीपासून बिनविरोध निवडणूक करण्यासाठी सत्ताधारी गटाने प्रयत्न चालविले होते, पण सुरुवातीच्या टप्प्यात फारसे यश आले नाही. त्यामुळे १९ जागांसाठी ५५ अर्ज दाखल झाले होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनी काम पाहिले. त्यातील ५२ जणांनी माघार घेतली. गुरुवारी माघारीचा अंतिम दिवसापर्यंत तीन अर्ज शिल्लक होते. दुपारी तीनच्या आधीच विद्यमान संचालक असलेल्या गडहिंग्लजच्या रत्नमाला घाळी यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे माघार घेत असल्याचे जाहीर केले. त्याचवेळी कोल्हापुरातून अरविंद माने या विद्यमान संचालकांसह इचलकरंजीचे सुनील पाटील यांनीही माघार घेत असल्याचे सांगितल्याने ‘बिनविरोध’चा मार्गच मोकळा झाला. १९ संचालकांपैकी कल्लेश माळी हे मृत झाल्याने तर रत्नमाला घाळी व अरविंद माने माघार घेतल्याने बाहेर राहिले असून उर्वरित १६ विद्यमानच पुन्हा संचालक राहणार आहेत.

चौकट ०१

संचालकांमध्ये तीन नवे चेहरे

रत्नमाला घाळी यांनी माघार घेतल्याने गडहिंग्लजमधून त्यांचेच चुलत भाचे व माजी अध्यक्ष शंकरराव घाळी यांचे चिरंजीव सतीश घाळी यांना संचालक होण्याची संधी मिळाली. सांगाव येथून राजेंद्र माळी तर कोल्हापुरातून वैभव सावर्डेकर हे आता नूतन संचालक असणार आहेत.

बँकेचे नवनिर्वाचित संचालक मंडळ असे : सर्वसाधारण गट : गणपतराव पाटील (शिरोळ), नानासाहेब नष्टे, सूर्यकांत पाटील-बुधिहाळकर, मावळते अध्यक्ष अनिल सोलापुरे, महादेव साखरे (नेसरी), राजेंद्र शेटे, राजेश पाटील-चंदूरकर, राजेंद्र लकडे, वैभव सावर्डेकर, सतीश घाळी, दिलीप चौगुले, सदानंद हत्तरगी (गडहिंग्लज), चंद्रकांत सांगावकर, बाबासाहेब देसाई, राजेंद्र माळी, अनिल स्वामी

महिला गट : शकुंतला बनछोडे, रंजना तवटे,

मागासवर्गीय गट : चंद्रकांत स्वामी.

चौकट ०२

२००५ नंतर पुन्हा बिनविरोध

कर्नाटकसह संपूर्ण महाराष्ट्र कार्यक्षेत्र, ३० हजार सभासद, १७०० कोटींची उलाढाल असलेली ७९ वर्षांची ही बँक पंधरा वर्षांपूर्वी २००५ मध्ये बिनविरोध झाली होती. २०१० मध्ये एका महिलेचा अर्ज राहिल्याने निवडणूक लागली होती, तर २०१५ मध्ये ८ अर्ज राहिल्याने निवडणुकीला सामोरे जावे लागले होते.

चौकट ०३

प्रतिक्रिया

बँकेच्या पारदर्शी कारभाराची परंपरा अखंडपणे जपावी या हेतूने निवडणूक बिनविरोध व्हावी, कोणतेही कलह असता कामा नयेत म्हणून केलेल्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाल्याने बँक बिनविरोध होऊ शकली.

सूर्यकांत पाटील-बुधिहाळकर,

माजी अध्यक्ष, वीरशैव बँक

(सिंगल १९ फोटो नांवाने वीरशैव बँक असे पाठवत आहे.

Web Title: Veershaiva Bank unopposed again after fifteen years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.