हायड्रोथेरपी तलाव, झोपण्यासाठी वाळूचे ढिगारे अन्... 'माधुरी'साठी वनतारा नांदणीत सुरु करणार पुनर्वसन केंद्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 13:48 IST2025-08-06T13:43:02+5:302025-08-06T13:48:28+5:30

वनताराकडून माधुरी हत्तीणीसाठी नांदणी मठाजवळ पुनर्वसन केंद्र उभारण्याच्या हालचाली

Vantara moves to set up rehabilitation center near Nandani Math for Mahadevi elephant | हायड्रोथेरपी तलाव, झोपण्यासाठी वाळूचे ढिगारे अन्... 'माधुरी'साठी वनतारा नांदणीत सुरु करणार पुनर्वसन केंद्र

हायड्रोथेरपी तलाव, झोपण्यासाठी वाळूचे ढिगारे अन्... 'माधुरी'साठी वनतारा नांदणीत सुरु करणार पुनर्वसन केंद्र

Madhuri Elephant:कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील नांदणीमधील माधुरी या हत्तीणींला कोर्टाच्या आदेशाने पोलीस बंदोबस्तात गुजरातमधील वनतारा पशुसंग्रहालयाच्या ताब्यात देण्यात आले. माधुरी हत्ती‍णीला वनतारामध्ये नेण्यावरून दोन आठवडे कोल्हापूर आणि नांदणी परिसरात संघर्ष सुरू होता. मात्र कोर्टाच्या आदेशानंतर माधुरीला वनताराकडे सोपण्याचा निर्णय झाला. या निर्णयाविरोधात कोल्हापुरकर रस्त्यावर उतरले. त्यानंतर वनताराच्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या प्रकरणावर चर्चा आणि माधुरीला परत पाठवण्यावर सहमती दर्शवली. यासोबत वनतारा माधुरीसाठी नांदणीत दुरस्थ पुनर्वसन केंद्र सुरु करणार आहे.

माधुरी हत्तीणीला गुजरातमधील वनतारामध्ये नेल्यानंतर वनताराबद्दल कोल्हापूरवासियांनी प्रचंड रोष व्यक्त केला होता. वाढत्या रोषानंतर वनताराची टीम नांदणी मठाधीशांसोबत चर्चेसाठी कोल्हापुरात दाखल झाली होती. यानंतर कायदेशीर प्रक्रियेद्वारे माधुरीला नांदणीत आणणार असल्याचे सांगण्यात आलं. तसेच नांदणी मठाने सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करावी. राज्य शासनही स्वतंत्र पुनर्विचार याचिका दाखल करून हत्तीणीला परत देण्यासंदर्भात भूमिका मांडेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. त्यानंतर वनताराही याचिकेमध्ये सहभागी होण्यास आणि माधुरीला परत पाठवण्यास तयार असल्याचे समोर आलं आहे. दुसरीकडे वनताराने माधुरीसाठी नांदणीमध्येच  पुनर्वसन केंद्र सुरु करणार असल्याचे सांगितले.

वनताराने निवेदनात काय म्हटलं?

नांदणी गावातील जैन संस्थान मठ आणि कोल्हापूरच्या लोकांमध्ये माधुरीचे आत्यंतिक धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे याची पूर्ण जाणीव वनतारास आहे. गेल्या अनेक दशकांपासून, ती आध्यात्मिक आणि सामाजिक जीवनाचा भाग राहिली आहे. माधुरी कोल्हापुरातच रहावी अशी इच्छा आणि आपुलकी व्यक्त करणाऱ्या भक्त, मठाचे नेते आणि लोकांच्या भावनांची पूर्ण जाणीव आहे. माधुरीला हलवण्याचा निर्णय कोर्टाने त्याच्या अधिकारात घेतला होता. वनताराने कोणत्याही टप्प्यावर माधुरीचे स्थलांतर स्थलांतर करण्याची शिफारस केली नाही किंवा तिचे स्थलांतर सुरू केले नाही. धार्मिक प्रथा किंवा भावनांमध्ये हस्तक्षेप करण्याचा कोणताही हेतू नव्हता.
माधुरीला कोल्हापूरला परत आणण्यासाठी मठ  आणि महाराष्ट्र सरकार यांनी सुप्री कोर्टासमोर केलेल्या कायदेशीर अर्जास वनतारा पूर्ण पाठींबा देईल. न्यायालयाच्या मान्यतेनुसार वनतारा तिच्या सुरक्षित आणि सन्मान्य परतीसाठी संपूर्ण तांत्रिक आणि पशुवैद्यकीय सहाय्य प्रदान करेल, असं वनताराकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
 
यासोबतच मठ आणि राज्य सरकारशी समन्वय साधून कोल्हापूर नजीकच्या नांदणी परिसरात वनतारा माधुरीसाठी दूरस्थ पुनर्वसन केंद्र सुरु करण्याचा प्रस्ताव वनताराने मांडला आहे. कोर्ट आणि परमपूज्य स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी यांनी मान्य केल्यास, मठ आणि राज्य सरकारशी समन्वय साधून कोल्हापूर नजीकच्या नांदणी परिसरात वनतारा माधुरीसाठी पुनर्वसन केंद्र सुरु करेल. उच्चाधिकार समितीच्या तज्ञांशी सल्लामसलत करून ही सुविधा विकसित केली जाईल, असं वनताराकडून सांगण्यात आलं.
 
 पुनर्वसन केंद्रात कोणत्या सोयी-सुविधा असणार?
 
* सांधे आणि स्नायूंवर उपचार करण्यासाठी हायड्रोथेरपी तलाव
* पोहणे आणि नैसर्गिक हालचालीसाठी वेगळे तळे
* शारीरिक पुनर्वसनासाठी लेसर थेरपी आणि उपचार कक्ष
* विश्रांती आणि संरक्षणासाठी रात्री निवास
* साखळ्या शिवाय मोकळेपणाने हालचाली करण्यासाठी हिरवीगार मोकळी जागा
* पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी आणि माधुरीच्या नैसर्गिक विधींसाठी वाळूने भरलेला हौद
* सतत वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी पूर्णपणे सुसज्ज ऑन-साइट पशुवैद्यकीय दवाखाना
* माधुरीला सुरक्षित आणि आरामदायी विश्रांती घेता यावी यासाठी रबराइज्ड फ्लोअरिंग प्लॅटफॉर्म
* पाय कुजल्याचे दुखणे बरे होण्यास, संधिवाताचा त्रास कमी होण्यास आणि सांध्यांवरील ताण कमी होण्यासाठी मदत व्हावी यासाठी आडवे होऊन झोपण्यासाठी खास काळजी घेऊन तयार केलेले मऊ वाळूचे ढिगारे.
 
दरम्यान, मठाचे परमपूज्य भट्टारक महास्वामीजी  आणि महाराष्ट्र शासन यांच्याशी चर्चा करून या सुविधेसाठी जागा निश्चित केली जाईल. कोर्टाकडून आवश्यक सूचना मिळताच वनताराच्या तज्ज्ञांचे पथक संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधून अंमलबजावणी सुरु करेल. केवळ माधुरी हत्तिणीचे पुनर्वसन करण्याच्या कोर्टाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी आणि सहकार्याच्या भावनेतून, मंजुरी मिळाल्यास आंतरराष्ट्रीय मानकांनुसार हा उपक्रम हाती घेण्यात येईल. नांदणी मठास हवे असलेले सर्व सहाय्य करण्याची इच्छा आणि तयारी असल्याचे वनताराने म्हटलं.

Web Title: Vantara moves to set up rehabilitation center near Nandani Math for Mahadevi elephant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.