महादेवी हत्तिणीला नांदणी मठाकडे देण्यास वनतारा तयार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 10:59 IST2025-08-07T10:58:48+5:302025-08-07T10:59:19+5:30

बैठकीस नांदणी मठाचे जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी, कोल्हापूर मठाचे लक्ष्मीसेन भट्टारक महास्वामी, कर्नाटकातील वरूर मठाचे स्वस्तिश्री धर्मसेन महास्वामी, वनताराचे मुख्य कार्यकारी अधिकारी विहान करणी यांची प्रमुख उपस्थिती होती.

Vantara is ready to give Mahadevi Hattini to Nandani Matha | महादेवी हत्तिणीला नांदणी मठाकडे देण्यास वनतारा तयार 

महादेवी हत्तिणीला नांदणी मठाकडे देण्यास वनतारा तयार 

कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महादेवी हत्तीण वनतारामध्ये आहे. ती परत नांदणी मठाकडे देण्यासाठी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात दाखल करणार असलेल्या फेरविचार याचिकेसंदर्भातील बैठकीत वनतारा सहभागी होणार आहे. ज्या आधारावर न्यायालयाने वनताराकडे हत्तीण देण्याचा आदेश दिला आहे. त्याच सेवा, सुविधा हत्तिणीसाठी नांदणी मठाच्या जमिनीत पुनर्वसन केंद्र उभारून दिल्या जातील. त्या केंद्रासाठी आवश्यक असलेली जमीन देण्याचा निर्णय बुधवारी जैन बोर्डिंगमध्ये झालेल्या बैठकीत झाला.

बैठकीस नांदणी मठाचे जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी, कोल्हापूर मठाचे लक्ष्मीसेन भट्टारक महास्वामी, कर्नाटकातील वरूर मठाचे स्वस्तिश्री धर्मसेन महास्वामी, वनताराचे मुख्य कार्यकारी अधिकारी विहान करणी यांची प्रमुख उपस्थिती होती.

महादेवीला परत आण्यासाठीचा रेटा वाढल्यानंतर वनताराचे सीईओ विहान करणी दुसऱ्यांदा कोल्हापूरला आले. बैठकीत त्यांनी सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वनताराने महादेवीला ताब्यात घेतल्याचे सांगितले. वनतारा तिची पुरेपूर काळजी घेत आहे. सर्वाेच्च न्यायालयातील फेरविचार याचिकेलाही सहकार्य राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. करणी यांनी बैठकीत न्यायालयाने आदेश दिला तर पुन्हा महादेवीला मठाच्या ताब्यात देण्यास तयार आहे. तोपर्यंत बहिष्काराचे सत्र मागे घ्या, अशी विनंती केली. यावर उपस्थित असलेल्या सर्वांनीच बहिष्कार जनतेने टाकल्याचे स्पष्ट केले.

प्रचंड पोलिस बंदोबस्त 
या बैठकीसाठी प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात होता. राजकीय प्रतिनिधीच्या स्वीय सहायकांनाही बाहेर काढण्यात आले. प्रवेशद्वारावर पोलिसांची फौज सज्ज होती. बैठकीस आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार राहुल आवाडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी, निवेदिता माने, प्रकाश आवाडे, कृष्णराज महाडिक, भगवान काटे, सावकर मादनाईक, जिल्हा पोलिस प्रमुख योगेशकुमार गुप्ता आदी उपस्थित होते.

वनतारा सीईओ आणि शेट्टी यांच्यात चकमक
बैठकीत वनताराचे सीईओ करणी यांनी महादेवी हत्तिणीची काळजी किती चांगली घेत आहोत, हे सांगत होते. यावर शेट्टी यांनी जोरदार आक्षेप घेत मठही चांगल्याप्रकारेच देखभाल आणि तिची काळजी घेत होता. कॉर्पाेरेट कार्यालयात बोलण्यासारखे येथे बोलू नका, असे त्यांना बजावले असल्याची माहिती शेट्टी यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

मठाची तयारी असताना वनताराचे केंद्र कशासाठी..?
महादेवीसाठी मठ सर्व प्रकारच्या सेवा, सुविधा देण्यास सक्षम आहे. तरीही वनतारा पुनर्वसन केंद्र का उभा करतो, असे म्हणते यावर बैठकीत चर्चा झाली. न्यायालयाने हत्तीण वनतारा येथे देण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे न्यायालयात नकारात्मक आदेश आला तरी तांत्रिक मार्ग काढण्यासाठी वनताराचेच एक केंद्र येथे तयार आहे. आम्ही तेथे हत्तिणीला ठेवत आहे, असेही म्हणता येईल, म्हणून केंद्र उभारण्याचा पर्याय समोर आल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

महादेवी हत्तीणसाठी नांदणी मठ, सरकार, वनतारा संयुक्तपणे सर्वाेच्च न्यायालयात फेरयाचिका दाखल करण्यावर एकमत झाले आहे. वनताराने नांदणी मठाच्या जमिनीत पुनर्वसन केंद्र उभारण्याचा प्रस्ताव दिला आहे. तेथे हत्तिणीसाठीच्या सेवा, सुविधाही ते देण्यास तयार आहेत. - जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी, नांदणी मठ.

कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठाजवळ वन विभागाने सुचविलेल्या जागेत महादेवी हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्याच्या पर्यायावर चर्चा सुरू असून, यासाठी वनतारा व्यवस्थापनाने राज्य सरकारला मदत करण्याची पूर्ण तयारी दर्शविली आहे. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

Web Title: Vantara is ready to give Mahadevi Hattini to Nandani Matha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.