Kolhapur: दोन वर्षांचे लेकरू उराशी घेऊन भर पावसात धावली हिरकणी, ५२ कि.मी पावनखिंड पदभ्रमंती केली पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 17:46 IST2025-07-15T17:46:21+5:302025-07-15T17:46:38+5:30
इतिहासाची मुलांना ओळख व्हावी आणि त्यांना जीवनात संघर्ष करण्यासाठी उर्मी मिळावी, ही तिची इच्छा

Kolhapur: दोन वर्षांचे लेकरू उराशी घेऊन भर पावसात धावली हिरकणी, ५२ कि.मी पावनखिंड पदभ्रमंती केली पूर्ण
कोल्हापूर : छत्रपती शिवराय आणि राजमाता जिजाऊ यांचे संस्कार आपल्या दोन्ही मुलांवर व्हावे, या ध्येयाने दोन वर्षांचे लेकरू उराशी घेऊन पाच वर्षांच्या मुलासोबत येथील शिवाजी पेठेतील वैष्णवी नितीन पवार (वय ३५) या हिरकणीने भर पावसात, चिखल तुडवत पन्हाळगड ते पावनखिंड ही ५२ किलोमीटरची पदभ्रमंती पूर्ण केली.
‘स्वराज रक्षक शिवबाचा मावळा’ या ट्रेकिंग ग्रुपने आयोजित केलेल्या पन्हाळा ते पावनखिंड ही पदभ्रमंती मोहीम आयोजित केली होती. छत्रपती शिवाजी महाराज ज्या मार्गाने पन्हाळागडावरून विशाळगडावर पोहोचले, त्यावरून चालण्याची, ज्या परिसरात वीर शिवा काशीद आणि वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्यासह शेकडो मावळ्यांनी बांदल सेनेसोबत गर्जनापूरची खिंड लढवत हौतात्म्य पत्करले, त्या शौर्याच्या इतिहासाची मुलांना ओळख व्हावी आणि त्यांना जीवनात संघर्ष करण्यासाठी उर्मी मिळावी, ही तिची इच्छा होती.
मसाई ते पावनखिंडीपर्यंतचे विस्तीर्ण पठार, सतत कोसळणारा पाऊस, चिखलाने भरलेल्या, घसरत्या पाऊलवाटा यामुळे मोकळे चालणेही मुश्कील असताना वैष्णवीने पाठीवर जीवनावश्यक वस्तूंची बॅग घेऊन दोन्ही मुलांसोबत न डगमगता ही पदभ्रमंती पूर्ण केली.