MPSC Result: वनसेवा परीक्षेत कोल्हापुरातील सांगरुळचा वैभव वातकरला चौथा, रोहन माळी पाचवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 12:18 IST2025-11-07T12:17:48+5:302025-11-07T12:18:13+5:30
या परीक्षेत ७८ पुरुष आणि २४ महिला परीक्षार्थींनी यश मिळवले

MPSC Result: वनसेवा परीक्षेत कोल्हापुरातील सांगरुळचा वैभव वातकरला चौथा, रोहन माळी पाचवा
कोल्हापूर : राज्य लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षेचा निकाल गुरुवारी सायंकाळी संकेतस्थळावर प्रसिद्ध केला. मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या १०२ परीक्षार्थींपैकी सांगरुळ गावच्या वैभव मारुती वातकरने चौथी रँक मिळवून यश संपादन केले. वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रथम वर्ग) पदासाठी त्याची नियुक्ती होणार आहे. या परीक्षेत ७८ पुरुष आणि २४ महिला परीक्षार्थींनी यश मिळवले. वैभवच्या यशाने सांगरुळमध्ये आनंदाचे वातावरण पसरले.
महाराष्ट्र वनसेवा परीक्षा राज्य लोकसेवा आयोगाद्वारे (एमपीएससी) घेतली जाते. आयोगाने ३६ जागांसाठी २०२३ मध्ये जाहिरात प्रसिद्ध केली होती. या परीक्षेमध्ये वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांसह पदांसाठी निवड होते, ज्यासाठी पदवीधर उमेदवारांची निवड केली जाते. वनरक्षक पदासाठी १२ वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी स्वतंत्र परीक्षा होते. राज्यातील लाखो उमेदवारांनी अर्ज केले होते. पूर्व परीक्षेनंतर मे २०२५ मध्ये पूर्व परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या उमेदवारांची अंतिम परीक्षा झाली होती.
सकाळी मुलाखती, सायंकाळी अंतिम निकाल
लेखी परीक्षेच्या निकालाआधारे मुलाखतीस प्रथमदर्शनी पात्र ठरलेल्या ठरलेल्या १०८ उमेदवारांना त्यांची पात्रता मूळ प्रमाणपत्रावरून तपासण्याच्या अटीमध्ये अधीन राहून गुरुवारी सकाळी मुंबईत मुलाखतीस बोलविण्यात आले. आयोगाने सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास निकाल जाहीर केला. १०२ परीक्षार्थींची नावे आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात आली. या निकालानंतर एमपीएससीकडून उमेदवारांना शिफारस पत्र दिले जाणार असून त्यानंतर राज्य सरकारकडून नियुक्ती दिली जाणार आहे.
कोणत्याही क्लासशिवाय मिळवले यश
वैभवने इचलकरंजी येथील डीकेटीई शिक्षण संस्थेतून २०१७ मध्ये बीई मेकॅनिकल ही पदवी घेतली. त्यानंतर त्याने दिल्लीत राहून यूपीएससी परीक्षेचा अभ्यास केला. दरम्यान त्याने राज्य लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा दिली. कोणत्याही क्लासशिवाय त्याने हे यश मिळवले अशी प्रतिक्रिया वैभवचे वडील मारुती वातकर यांनी व्यक्त केली.
रोहन माळी राज्यात पाचवा
खोची : लाटवडे (ता. हातकणंगले)येथील रोहन प्रकाश माळी याने लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या सहायक वनसंरक्षक परीक्षेत राज्यात पाचवा क्रमांक पटकावला. दुसऱ्या प्रयत्नात त्याने हे यश मिळविले. प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश बंडू माळी व अध्यापिका छाया प्रकाश माळी यांचा तो मुलगा आहे.
रोहन याने दहावीच्या परीक्षेत केंद्रात प्रथम क्रमांक पटकावला होता. पुणे येथील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधून त्याने मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी मिळाल्यानंतर त्याने यूपीएससीची तयारी सुरू केली. एमपीएससी वतीने सन २०२४ मध्ये राज्य वनसेवा विभागाची सहायक वनसंरक्षक परीक्षा दिली. त्यामध्ये त्याने २८२ गुण मिळवित राज्यात पाचवा क्रमांक पटकावला. निकाल जाहीर झाल्यानंतर त्याच्या घरी आनंदोत्सव साजरा करण्यात आला.