ऊसतोडीचा खेळ मांडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:59 IST2021-01-13T04:59:26+5:302021-01-13T04:59:26+5:30

कोल्हापूर : ऊसतोडीच्या या अन्यायचक्रात सर्वाधिक भरडला आहे तोे अल्पभूधारक शेतकरी. अगोदरच वाढलेले खत, मजुरी, मशागतीचे दर यामुळे कर्ज ...

Ustodi's game was played | ऊसतोडीचा खेळ मांडला

ऊसतोडीचा खेळ मांडला

कोल्हापूर : ऊसतोडीच्या या अन्यायचक्रात सर्वाधिक भरडला आहे तोे अल्पभूधारक शेतकरी. अगोदरच वाढलेले खत, मजुरी, मशागतीचे दर यामुळे कर्ज व उसाचा हप्ता याचा मेळ घालताना नाकीनऊ आले असताना, आता ऊसतोडीसाठी पाया पडत फिरण्याची वेळ त्याच्यावर आली आहे. तोडीसाठी पैसे मागतात म्हणूून तक्रार करावी, तर सगळे देतात, तुला काय अडचण आहे, असा उपदेश ऐकावा लागतो. पैसे देणार नाही म्हटले, तर आपलाच ऊस मागे राहिला, तर तो तोडण्यासाठी येणार कोण, हा प्रश्न आहेच. खुद तोडणी करावी तर तेवढे माणूसबळ नाही. त्यामुळे हा शेतकरी पुरता पिचलेला दिसून आला. त्यातील काही प्रतिनिधिक प्रतिक्रिया देत आहोत.

.....................

आमच्या भागात एका ट्रक लोडसाठी ३ ते ४ हजार रुपये घेतले जात आहेत व ते मुकाट्याने देण्याशिवाय आमच्यासमोर पर्याय राहिलेला नाही. याला शेतकरीही जबाबदार आहे. ऊसतोडीसाठी चिटबॉयच्या मागे लागणे बंद केल्याशिवाय हे प्रकार थांबणार नाहीत. तसेच क्रमपाळी पत्रकानुसार तोड झाली पाहिजे. साखर कारखानदारांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे.

- कृष्णकांत रेंगडे, शेतकरी,

अडकूर, ता. चंदगड

....................

जो पैसे देईल त्यालाच तोडणी, असा नवा फंडा सुरू झाला आहे. चिटबॉय, मुकादम, टॅक्टर मालक असे टोळकेच तयार झाले आहे. तोडीसाठी पैसे द्या, तोड सुरू झाल्यावर चहा -बिस्कट द्या, तोड संपल्यावर चिकन द्या, असा नको तेवढा लाड सुरू झाला आहे. ऊस आम्ही यांना लुटून देण्यासाठी लावला आहे काय?, अशी परिस्थिती आहे. कारखान्यांनी याकडे लक्ष द्यावे.

- उल्हास उत्तम पाटील,

शिरोळ

................

आमच्याकडे खेपेला १२०० रुपये असा दर पडला आहे. याकडे कारखाना प्रशासनाने झोपेचे सोंग घेऊन दुर्लक्ष केले आहे. यंदा कोरोनामुळे मजूर आले नसल्याने खुद तोडीने ऊस तोडून आणा, असे सांगितले जाते. मग कारखान्याच्या संचालकांचा व प्रशासनातील अधिकाऱ्यांचा ऊस मजुरांकडून कसा काय तोडला जातो? या प्रकाराला शिस्त लावण्यासाठी कोणी पुढाकार घेणार आहे का? साखर सहसंचालक कार्यालय केवळ पगार घेण्यासाठी सुरू केले आहे का?

- संजय पाटील

वाकरे, ता. करवीर

................

आमच्याकडे गुंठ्याला तोडणीसाठी १५० रुपये असा दर केला आहे. त्यात पुन्हा जो ऊस उभा असेल, तोच तोडण्यास प्राधान्य दिले जात आहे. स्वाभाविकपणे आडसाली ऊस पडलेला असतो. त्यामुळे आमच्या गावात आडसाली तसाच ठेवून खोडवा ऊस तोडणी जोरात सुरू आहे. ऊस हे पडणारेच पीक असेल, तर पडलेला ऊस आम्ही तोडणार नाही म्हणणे, कितपत योग्य आहे? यावर कारखानदारांनी मार्ग काढला पाहिजे.

- प्रल्हाद पाटील, घुणकी, ता. हातकणंगले

................

माझा ६० गुंठे ऊस तोडीसाठी १० हजार रुपये घेतले. १५ डिसेंबरपासून तोडणी सुरू आहे. अजून ऊस तोडून संपलेला नाही. कारण दोन-चार दिवसात एखादी ट्राॅलीच ऊस तोडून नेला जात आहे. याबाबत मी कारखान्याच्या शेती अधिकाऱ्याकडे तक्रार केली, तर तो म्हणतो, मुकादम आमचे ऐकत नाही. अशी व्यवस्था असेल तर शेतकऱ्याला न्याय कसा मिळेल? यावर कारखाना प्रशासन किंवा साखर सहसंचालक यांनी कारवाई करण्याची गरज आहे.

- नरेंद्र वरूटे, कसबा बीड, ता. करवीर

.................

तोडणीसाठी पैसे, चालकाला एन्ट्री देऊन आमच्या भागातील शेतकरी वैतागला आहे. तक्रार करावी तर पुन्हा ऊस तोडणार नाहीत, याची धास्ती वाटते. शेतकऱ्यांना कोणी वाली आहे का, असा प्रश्न हे सर्व पाहिल्यावर वाटतो. कारखानदारांना ऊस आल्याशी मतलब आहे. बाकी खाली कशी लूट सुरू आहे याचे त्यांना काही देणे-घेणे नाही. या विषयावर लवकर तोडगा काढला नाही तर ऊसकरी शेतकरी उद्ध्वस्थ होण्याची भीती आहे.

- राजेंद्र पाटील, सातवे सावर्डे, ता. पन्हाळा

...............

तोडणी मजुरांची कमतरता आहे म्हणून आम्हाला तुम्ही ऊस तोडून ठेवा, आम्ही भरून घेऊन जातो, असे सांगितले जाते. आम्ही दोन दिवस ऊस तोडतो व तिसऱ्या दिवशी ट्रॅक्टरवाला तो भरून नेतो. वास्तविक आम्ही स्वत: ऊस तोडला असल्याने त्याची तोडणी आम्हास मिळणे अपेक्षित आहे. पण तसे न होता तोडणीही त्या ट्रॅक्टरच्या मागे असलेल्या टोळीलाच मिळते, हा कसला न्याय? केवळ ऊस पिकवलाय म्हणून आम्ही तोडणीसाठी घाम गाळत आहोत. आता येथून पुढे ऊस लावायचा का नाही, या मानसिकतेवर आम्ही आलो आहे.

- पांडुरंग दादू पाटील, म्हाकवे, ता. कागल

...............

उद्याच्या अंकात: साखर कारखान्यांच्या अध्यक्षांच्या प्रतिक्रिया

Web Title: Ustodi's game was played

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.